महिलांनी इंटरनेटचा वापर करताना स्वतःची ओळख जाहीर करू नये -नगराध्यक्षा अश्विनी कासनाळे


*अहमदपूर येथील "सायबर सेफ वुमन" कार्यशाळेस महिला व विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद




           लातूर, दि 3:- महिला व बालकांवर होणारे अत्याचार तसेच सायबर गुन्हे रोखण्यासाठी अत्याचारासंदर्भात तसेच कायद्यासंदर्भात महिला व विद्यार्थिनी मध्ये जागृती निर्माण करण्यासाठी शासनाने आयोजित केलेला सायबर सेफ वुमन हा उपक्रम अत्यंत चांगला आहे. तरी महिला व विद्यार्थिनींनी इंटरनेटचा वापर करत असताना आपली स्वतःची ओळख जाहीर करू नये. तसेच डिजिटल माध्यमाचा वापर करताना सायबर सुरक्षितता याबाबत जागृत राहावे असे, आवाहन अहमदपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती अश्विनी कासनाळे यांनी केले.
       अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या सभागृहात जिल्हा पोलीस दल, जिल्हा माहिती कार्यालय व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सायबर सेफ वूमन बाबतच्या कार्यशाळेत श्रीमती कासनाळे बोलत होत्या. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर अश्विनी पाटील, तहसीलदार अरुणा संगेवार, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य एस. आर. जाधव, अहमदपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
        नगराध्यक्ष श्रीमती कासनाळे पुढे म्हणाल्या की, डिजिटल युगात महिलांनी इंटरनेटचा वापर करत असताना योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. कारण डिजिटल विश्वातील एक चूक ही संपूर्ण जीवन उध्वस्त करू शकते, त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थिनी  व महीला तसेच इंटरनेटचा वापर करणाऱ्या सर्वांनी अधिक सजग रहावे असे आवाहन त्यांनी केले.
                यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर पाटील यांनी महिलांनी सायबर सुरक्षेबाबत कशापद्धतीने खबरदारी घ्यावी याबाबतचे मार्गदर्शन केले. तसेच महिलावर अत्याचार झाला असेल तर त्याबाबतची तक्रार तात्काळ पोलीस विभागाला करावी, जेणेकरून संबंधित गुन्हेगाराला कायद्याद्वारे कठोर शिक्षा बसून अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कायद्याचा वचक बसेल असे त्यांनी सांगितले. तर तहसीलदार श्रीमती संगेवार यांनी सर्व विद्यार्थिनींनी व महिलांनी अधिक जागरूकपणे महिलाविषयक कायद्यांची माहिती घ्यावी तसेच आपल्या मोबाईल मध्ये सुरक्षा विषयक ॲप डाऊनलोड करावेत असे आवाहन त्यांनी केले.
          यावेळी पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांनी सायबर सुरक्षिततेबाबत  शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी व महिलांनी काय करावे? व काय करू नये? याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थिनींनी आपल्या पालकांशी विशेषता आईशी दैनंदिन चर्चा करावी व कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार अथवा अन्याय होत असेल तर त्याबाबतची माहिती घरी आईला द्यावी व त्यातून त्याबाबतची तक्रार पोलिस विभागाला करावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य श्री जाधव यांनीही महिला सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा सायबर सेफ वूमन मोहिमेबाबतचा व्हिडीओ संदेश दाखविण्यात आला.
       प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक शिरसेवाड यांनी पावर पॉइंट च्या द्वारे महिला सायबर सुरक्षेबाबत सविस्तर माहिती सादर केली. या कार्यशाळेस महात्मा फुले महाविद्यालयातील विद्यार्थिनी, स्वयंसेवी संस्थाचे महिला प्रतिनिधी, पोलीस विभागाच्या महिला प्रतिनिधी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु