लातूर महापालिका निवडणूक निर्भय,
मुक्त व पारदर्शकपणे पार पाडावी
- राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया
लातूर, दि.
13: लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक
2017 करिता दिनांक 19 एप्रिल 2017 रोजी मतदान होत आहे. सदरची निवडणूक प्रशासनाने निर्भय,
मुक्त व पारदर्शकपणे पार पाडावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी
दिले.
लातूर शासकीय विश्रामगृहातील सभागृहात लातूर महापालिका
निवडणूक कामाच्या आढावा बैठकीत श्री. सहारिया बोलत होते. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, पोलीस
अधिक्षक शिवाजी राठोड, अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निरीक्षक पुरुषोत्तम पाटोदकर,
मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी रमेश पवार, उपायुक्त संभाजी वाघमारे, सतिश शिवणे,
आचार संहिता कक्ष प्रमुख जनार्धन विधाते, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, आयकर व विक्रीकर
विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
राज्य निवडणूक आयुक्त श्री. सहारिया पुढे म्हणाले
की, प्रत्येक मतदान केंद्रात पायाभूत सर्व सोयी-सुविधा निर्माण करुन सर्वच्या सर्व
371 मतदान केंद्रे ही आदर्श मतदान केंद्रे असली पाहीजेत. याकरिता प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी व मनपा
आयुक्त यांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे त्यांनी सूचित केले. तसेच उन्हाची तीव्रता
वाढत असून प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ही तापमानात वाढ होणे अपेक्षीत धरुन मतदान केंद्राच्या
ठिकाणी सावलीची व्यवस्था केली पाहीजे. त्याप्रमाणेच मतदाराच्या आरोग्याबाबत आपत्तकालीन
परिस्थिती उद्भवल्यास प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध ठेवण्याची सूचना श्री. सहारिया
यांनी केली.
दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी व्हिल
चेअर आदि व्यवस्था करावी, असे सांगून मतदान केंद्राच्या बाहेर जेथे मतदारांच्या रांगा
लागतात त्या ठिकाणी उमेदवारांची प्रसिध्द करावयाच्या माहितीचे फ्लेक्स वाचता येतील
अशा पध्दतीने लावणे अपेक्षित असल्याचे श्री. सहारिया यांनी सांगितले.
लातूर महापालिका निवडणूकीसाठी एकूण 2 लाख 77 हजार 775 मतदार असून या सर्व मतदारांना
व्होटर स्लिपचे वाटप शंभर टक्के झालेच पाहीजे याबाबत दक्षता घेण्याची सूचना श्री. सहारिया
यांनी केली. तसेच दिनांक 19 एप्रिल 2017 रोजी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे
याकरिता मतदार जनजागृती मोहिम अधिक प्रभावीपणे राबवून मागील निवडणूकीच्या तुलनेत किमान
15 टक्के मतदान अधिक झाले पाहीजे याकरिता प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
आदर्श आचारसंहितेचा
भंग होणार नाही याबाबत सर्व पथकांनी दक्षता घ्यावी. तसेच कोणाकडूनही आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास त्यावर
त्वरित कारवाई करण्याचे निर्देश श्री. सहारिया यांनी दिले. तर पोलीस विभागाने निवडणूक
कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवावा, असे सांगितले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने निवडणूक कालावधीत व
मतदानाच्या दिवशी दारुचे वाटप होणार नाही याकरिता पोलीस विभागाच्या मदतीने काम करावे.
तर आयकर विक्रीकर व जिल्हा अग्रणी बँक अधिका-यांनी त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी
चोखपणे पार पाडण्याचे निर्देश श्री. सहारिया यांनी दिले. यावेळी निवडणूक विभागाचे सचिव
शेखर चन्ने यांनी ही निवडणूक कामकाजाबाबत मार्गदर्शनपर सूचना दिल्या.
पोलीस अधीक्षक
श्री. राठोड यांनी निवडणूक कालावधीत 14 गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली असून पाच
जणांचा तडीपार करण्यासाठीचा प्रस्ताव लातूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात
आल्याचे सांगितले. तर एकूण 325 शस्त्रापैकी 215 शस्त्रे जमा झाली असून 40 शस्त्रे लवकरच
जमा होतील तर 70 शस्त्र परवाना हे बँकांच्या सुरक्षा रक्षकांचे असल्याचे जमा करण्यात
आले नसल्याचे सांगितले. तसेच निवडणूकीच्या
दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर योग्य बंदोबस्त ठेवण्यात येणार असून एसआरपीएफच्या दोन
कंपन्या व 700 होमगार्ड बाहेरुन उपलब्ध होणार असल्याने कायदा व सुव्यवस्था चोखपणे ठेवली
जाईल असे श्री. राठोड यांनी सांगितले.
मनपा आयुक्त श्री. पवार यांनी एकंदरीतच सर्व
प्रक्रीयेची माहिती देऊन मतदान जनजागृतीसाठी करण्यात येत असलेल्या मोहिमेची माहिती दिली. व या निवडणूकीत याद्वारे 70 ते 75 टक्के मतदान होईल, या करिता प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी मनपा उपायुक्त सतीश शिवणे यांनी पॉवर पॉईंट प्रझेन्टेशनद्वारे निवडणूकीसाठी प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती सादर केली.
राजकीय
पक्षासोबत बैठक :-
राज्य
निवडणूक आयुक्त श्री. सहारिया यांनी महापालिका निवडणूकीत सहभागी झालेल्या प्रमुख राजकीय
पक्ष, संघटना व आघाडी यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला व सदरच्या निवडणूकीबाबत त्यांच्या
अडचणी जाणून घेतल्या
*****
Comments
Post a Comment