लातूर येथे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास प्रारंभ शासनाच्या जास्तीत जास्त योजनांचा लाभ सैनिक, माजी सैनिक कुटुंबियांना देण्यासाठी प्रयत्न करणार -जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
लातूर येथे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास प्रारंभ
शासनाच्या जास्तीत जास्त योजनांचा लाभ सैनिक,
माजी सैनिक कुटुंबियांना देण्यासाठी प्रयत्न करणार
-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
· सलग दुसऱ्या वर्षी निधी संकलनात लातूर जिल्हा राज्यात द्वितीय
लातूर, दि. ०९ : सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास जिल्ह्यात आजपासून प्रारंभ झाला आहे. देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या, बलिदान करणाऱ्या सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी यामाध्यमातून आपल्याला प्राप्त होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने सशस्त्र सेना ध्वजदिन निधीमध्ये आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील सैनिक, माजी सैनिक कुटुंबियांना मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक बोर्डाच्या अध्यक्ष श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनास सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, जिल्हा सैनिक अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.), ईसीएचएसचे प्रभारी अधिकारी कर्नल प्रकाश राजकर (नि.), ले. कर्नल बी. आर. हरणे (नि.) यांच्यासह वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. प्रारंभी वीरमाता, वीरपिता यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. तसेच शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
आपल्या देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांमुळे आपण सुरक्षित आहोत. या सैनिक, माजी सैनिकांच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांना हातभार लावण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात आपले योगदान द्यावे, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या. सैनिक, माजी सैनिक कुटुंबियांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अभिसरणासह इतर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. माजी सैनिक कुटुंबातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठीही विशेष उपक्रम हाती घेण्यात येतील, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या.
प्रत्येक वर्षी ७ डिसेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन करण्यात येते. ७ डिसेंबर २०२४ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत लातूर जिल्ह्याला ४७ लक्ष रुपये निधी संकलनाचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. मात्र, जिल्ह्यात १ कोटी १५ लाख ९५ हजार रुपये निधी संकलन करून २४६.७० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. त्यामुळे निधी संकलनात जिल्ह्याने सलग दुसऱ्या वर्षी राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. यंदाही जिल्ह्याला ४७ लाख रुपयांचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनामध्ये योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी केले.
यावेळी उपस्थित वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता यांचा जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शौर्य पदक प्राप्त सैनिकांच्या वीरपत्नी, माजी सैनिक, विशेष पुरस्कार प्राप्त माजी सैनिक पाल्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. गतवर्षी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शासकीय कार्यालय प्रमुखांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. ‘गंध स्वरांचा’ टीमने यावेळी देशभक्तीप्र गीतांचे सादरीकरण केले. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील वरिष्ठ लिपिक एस. व्ही. घोंगडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
****
Comments
Post a Comment