लातूर जिल्ह्यातील रस्त्यांची सर्व कामे 2018 पर्यंत पूर्ण करणार
                               -पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर

          लातूर, दि. 4 : प्रत्येक गाव, शहर, जिल्हा व पर्यायाने देशाचा विकास हा तेथील चांगल्या व दर्जेदार दळणवळणाच्या सुविधांमुळे अधिक गतीने होत असतो. त्यामुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर करुन लातूर जिल्ह्याच्या विकासाचा गाडा अधिक गतीमान करण्यात येणार असून सन 2018 पर्यंत जिल्ह्यातील रस्त्यांची सर्व कामे पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन कौशल्य विकास, कामगार कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केले.
          निलंगा तालुक्यातील बोरसुरी, तगरखेडा व होसूर येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर रस्त्यांच्या कामाचे भूमीपूजन तसेच होसूर निम्न पातळी बंधा-याचे जलपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर बोलत होते. या कार्यक्रमास खासदार सुनील गायकवाड, आमदार सुधाकर भालेराव,जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता ओमप्रकाश निला, उपविभागीय अधिकारी भवानजी आगे, निम्न तेरणा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता ई.एम.चिस्ती, टाटा पॉवर कंपनी मानव संसाधन विभागाचे प्रमुख नागोराव कुमार, सुनील दळवी, अरविंद पाटील, जि.प.सदस्या श्रीमती मधु बिराजदार, बोरसुरी, हिसूर व तगरखेडा गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        पालकमंत्री निलंगेकर म्हणाले की, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून लातूर जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला जाणार आहे. त्याप्रमाणेच जिल्ह्यातून जाणारे राज्यमार्ग व नवीन राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना मंजुरी मिळालेली असून जिल्ह्यातील रस्त्यांची सर्व कामे 2018 पर्यंत पूर्ण करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. उदगीर-निलंगा मध्ये रेल्वे आणण्यासाठी सन 2019 पर्यंत सर्व पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील व पुढील कालावधीत या भागात रेल्वेचे जाळे निर्माण करुन या भागाच्या विकासाला अधिक चालना देण्यात येईल, असे श्री. निलंगेकर यांनी सांगितले.
           मागील दोन वर्षापासून शेतक-यांचे अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. त्या सर्व शेतक-यांच्या बँक खात्यावर पिक विम्याचे अनुदान शासनाने थेट जमा केलेले असून यावर्षी लातूर जिल्ह्यातील सोयाबीन व इतर तत्सम पिकांचे अतिवृष्टीने व पूराने झालेल्या निकसानी साठी शासनाकडून राज्यात सर्वात जास्त अनुदान लातूर जिल्ह्याला मिळवून देऊ असे श्री. निलंगेकर यांनी सांगितले. तसेच लातूर जिल्ह्याला या पुढील काळात जास्तीत जास्त रोहित्रे उपलब्ध करुन अखंडीतपणे शेतक-यांना वीज पुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
         लातूर जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार कुशल बनवून त्यांना कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करुन दिला जाणार आहे. त्याचाच पहिला टप्पा म्हणून टाटा पॉवर कंपनी जिल्ह्यातील आडीच हजार बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या कंपनीत नोकरी उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती श्री. निलंगेकर यांनी दिली. बेरोजगारांची निवड,तपासणी, प्रशिक्षणावरील सर्व खर्च टाटा कंपनी करणार असून तीन महिन्याच्या प्रशिक्षण कालावधीत प्रतिमहा 15 हजार रुपये मानधन प्रशिक्षणार्थी बेरोजगारांना मिळणार आहे.
          मागील ब-याच वर्षापासून होसूर निम्न पातळी बॅरेजचे काम रखडले होते. ते सर्व काम आज पूर्ण झालेले असून या बॅरेजमधील पाण्याचे पूजन करुन ह्या बंधा-याचे लोकार्पण करण्यात येत असल्याचे श्री. निलंगेकर यांनी सांगितले. या बॅरेजच्या पाण्यामुळे होसूर व परिसरातील शेकडो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
           जलयुक्तच्या कामांमुळे राज्यात लातूर जिल्ह्याची एक वेगळी ओळख निर्माण झालेली असून या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जलसंधारणाची विविध कामे पूर्ण करुन पाण्याची उपलब्धता करुन भूजल पातळीत वाढ केली जाणार असल्याचे श्री. निलंगेकर यांनी सांगितले.
            लातूर जिल्ह्याच्या पर्जन्यमानाची वार्षीक सरासरी इतर दुध उत्पादक जिल्ह्यांपेकक्षा अधीक असूनही या भागात शेतक-यांना जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करण्यास अद्यापपर्यंत प्रोत्साहन दिले गेले नव्हते. परंतु या पुढील काळात जिल्ह्यात दुग्धव्यवसायाला चालना देऊन शेतकरी वर्गाला उत्पन्न मिळवून देणारा जोडधंदा करण्याबाबत प्रोत्साहन व प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती श्री. निलंगेकर यांनी दिली.
            ज्या भागात रस्ते खराब आहेत त्या सर्व गावांना चांगले रस्ते मिळणार आहेत. तसेच कौशल्य विकास विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यात किमान 40 अभ्यासक्रम सुरु होऊन बेरोजगारांना रोजगार कुशल बनविले जात असल्याचे खासदार सुनील गायकवाड यांनी सांगितले. केद्र व राज्य शासन सर्व सामान्य जनतेच्या विकासाच्या योजना मोठ्या प्रमाणावर राबवित आहे असे सांगून आमदार भालेराव म्हणाले की सन 2018 पर्यत प्रत्येक निराधार व्यक्तीला पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घर मिळणार आहे.
          होसूर निम्न पातळी बंधाऱ्यांमुळे मांजरा नदी पात्रात 12 किलो मीटर क्षेत्रात पाणी साठा उपलब्ध झाला असून या भागातील  सुमारे  700 ते 800 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी  पोले यांनी दिली.तसेच गाव विकासाच्या दृष्टीने रस्त्यांच्या कामांचे भुमीपुजन होत असून काही ठिकाणी रस्ता मार्गावर अतिक्रमणे आहेत ती  सर्व संबंधितांनी स्वत:हून काढण्याचे आवाहन त्यांनी केले.
      कार्यकारी अभियंता श्री.निला यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून लातूर जिल्हयातील  18 रस्त्यांचा कामांना मंजुरी मिळाली असून याअंतर्गत 200 किलो मीटर रस्त्यांची  कामे पुर्ण केली जाणार असल्याचे सांगून याकरिता शासनाने शंभर कोटीचा निधी मंजुर  केली असल्याची माहिती त्यांनी दिली. याअंतर्गत बोरसुरी ते औराद या 9.60 किलो मीटरच्या रस्त्याकरिता 3 कोटी 54 लाख,  तांबरवाडी ते तगरखेडा 3 किलो मीटरसाठी 1 कोटी 50 लाख तसेच होसूर ते हलगरा या 9.50 किलो मीटर रत्याच्या कामासाठी साडेतीन कोटी निधी मंजुर असल्याची माहिती त्यांनी दिली.
            प्रारंभी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बोरसुरी ते औराद, तांबरवाडी ते तगरखेडा,चिचोंडी होसूर ते हालगरा, आदि रस्त्यांच्या कामांचे भुमीपुजन झाले त्यानंतर होसूर निम्न पातळी बंधारा लोकार्पण  व जलपुजन झाले. त्यानंतर अंबुलगा येथील पुलांच्या कामाचे भुमीपुजन लमाणतांडा, राठेाडा तांडा,बेलकुंड- मातोळा रस्त्यांच्या कामांचे भुमीपुजन कार्यक्रम करण्या


त आले.


*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु