भारतीय लोकशाहीच्या बळकटकीकरणासाठी  सुज्ञ मतदार आवश्यक
                                                                   -जिल्हाधिकारी पांडुरंग  पोले

        लातूर,दि.25: राष्ट्रीय मतदार दिवसाच्या माध्यामातून भावी मतदार असलेल्या तरूण पिढीला मतदार बनवून  मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी करण्याचे उदिष्ट आहे. व हाच सुज्ञ भावी मतदार भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी आवश्यक  असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी  तथा जिल्हा निवडणूक  अधिकारी पांडूरंग पोले यांनी केले.
            येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील डीपीसीच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिवसाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी  पोले बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रताप काळे, उपविभागीय अधिकारी  रामेश्वर रोडगे, जर्नाधन विधाते,तहसिलदार संजय वारकड, अहिल्या गाठाळ, पोद्दार इंटरनॅशनल स्कुलचे प्राचार्य अरविंद सिंग, काकशिट महाविद्यालयाचे प्राचार्य एन.सी. झुल्पे, लाहोटी तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. कुंभार, मतदार जागृती अभियानाचे समन्वयक श्री.नितनवरे, नायब तहसिलदार पी.डी. जाधव यांच्यासह नव मतदार, महाविद्यालयीन विद्यार्थी व निवडणुक विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी पोले पुढे म्हणाले की, भारत हा जगातील सर्वात मेाठा लोकशाही प्रधान देश असून तरुणांचा संख्या ही सर्वात जास्त आहे. त्यामुळे या मतदारांना मतदार बनवून मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेतल्यास भारताची लोकशाही अधिक सुदृढ बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
            भारतात सुरूवातीच्या काळात साक्षरतेचे प्रमाण कमी असले तरी येथील मतदारांनी  वेळोवेळी  झालेल्या निवडणुकांमधून आपण सुज्ञ  असल्याचे दाखवून दिलेले आहे. सदयपरिस्थीमध्ये देशात साक्षरतेचे प्रमाणे 75 टक्के पेक्षा अधिक असून यामध्ये तरूण वर्गाची लोकसंख्या खुप मोठी असल्याने या युवकांना केंद्रबिंदु मानुन भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार दिवसाच्या माध्यामातून नवमतदार जनजागृती  मोहिम हाती घेतली असल्याचे श्री. पोले यांनी सांगितले.
            भारत देश व येथील लोकशाही शासनप्रणाली ही युवा वर्गाच्या हाती असल्याने या नवमतदारांनी सुज्ञपणे आपल्या मतदानाचा  हक्क बजाविणे आवश्यक असल्याचे श्री. पोले यांनी सांगितले. तसेच या युवा वर्गाला नवमतदार बनविण्यात प्रत्यक्ष फिल्डवर  महत्वाची कामगिरी पार पाडणारे ब्लॅाक लेवल ऑफिसर (बी.एल.ओ.) हे निवडणूक आयोगाचे सैनिकच असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
            यावेळी जिल्हाधिकारी पोले यांनी नवमतदार,ज्येष्ठ मतदार, बीएलओ, निवडणूक विभागाचे अधिकारी कर्मचारी व सर्व मतदारांना राष्ट्रीय मतदार दिनाच्या शुभेच्छा देऊन सशक्त लोकशाही निर्माण होण्यासाठी  ‘मतदार शपथ’ घेतल्या प्रमाणे  मतदान करण्याचे आवाहन केले.
            उपजिल्हा निवडणूक अधिकारी काळे  यांनी आज संपूर्ण देशात राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मतदार जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जात असल्याचे सांगून यावर्षीच्या सातव्या राष्ट्रीय .मतदार दिवसाचे सक्षम करू या, युवा व भावी मतदार हे घोषवाक्य असल्याचे सांगितले तसेच मतदार जनजागृतीसाठी निवडणूक विभागाकडून घेण्यात आलेल्या चित्रकला, रांगोळी, वर्क्तृव, घोषवाक्य स्पर्धांची माहिती त्यांनी  दिली.  तसेच राष्ट्रीय मतदार दिवसाच्या आयोजनाचा उद्देश सांगुन प्रत्येक नागरिकांने मतदार बनुन मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
            यावेळी पोद्दार इंटरनॅशनल स्कुलचे विद्यार्थी कुमारी रुही मैदरकर व कुमार सौरभ चिद्रेवार यांनी भारतीय लोकशाही, मतदानाचे महत्व याबाबतचे विचार मनोगतातून व्यक्त केले.
            प्रारंभी जिल्हाधिकारी पांडूरंग पोले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून राष्ट्रीय मतदार दिवसाच्या कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यानंतर भारत निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त डॉ. नजीम जैद्दी यांचा दृकश्राव्य संदेश मतदारांना दाखविण्यात आला. त्यांनतर भारत निवडणूक आयोगाने घेतलेल्या  पहिल्या निवडणूकापासून  ते आजपर्यंतच्या निवडणूकांच्या प्रवासाबाबत चित्रफित दाखविण्यात आली.
            तसेच 1 जानेवारी रोजी प्रथमच मतदार झालेल्या नवमतदारांना जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात  मतदार कार्डाचे वाटप करण्यात आले. तर 93 वर्षाचे ज्येष्ठ मतदार श्री.गणपत शिंदे यांचा विशेष सत्कार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.
            मतदार जनजागृती अभियान-2017 अंतर्गत चित्रकला, रांगोळी, घोषवाक्य, संवाद साधने या स्पर्धेतील स्पर्धकांना जिल्हाधिकारी पोले व मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम ,प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तर या अभियानात सहकार्य केल्याबद्यल पोद्दार  स्कुलचे अरविंद सिंग ,कॉकशिट महाविद्यालयाचे प्राचार्य झुल्पे, लाहोटी तंत्रनिकेतनचे कुंभार, समन्वयक नितनवरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.त्याप्रमाणेच याअतर्गत चांगले काम करणाऱ्या महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच बी.एल.ओचा सत्कार  श्री. पोले यांच्या हस्ते करण्यात आला.
            कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन प्रा. कैलास जाधव यांनी  केले तर आभार  अव्वल कारकुन गणेश सरोदे यांनी मानले.



मतदार जनजागृती रॅली
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदारामध्ये जनजागृती करण्यासाठी शहरातील टॉऊन हॉल येथून शिवाजी चौक मार्ग जूने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरापर्यंत मतदार जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीस जिल्हाधिकारी पांडूरंग पोले यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ झाला. या रॅलीत पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन,  व काकशिट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.  यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रताप काळे, तहसिलदार संजय वारकड  व महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.

                                                            *****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु