संविधानामुळे भारतीय लोकशाहीला जगात श्रेष्ठ मानले जाते
                                                                         -पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर

          लातूर, दि. 26 :  26 जानेवारी 1950 रोजी संविधान स्वीकारल्या पासून भारत हे एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून जगासमोर आले. भारतीय लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेली भारतीय  राज्यघटना ज्या समितीने तयार केली त्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहुमोल योगदान लाभले व त्यामुळेच प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून उदयास आलेल्या भारतीय लोकशाहीला जगात आज श्रेष्ठ मानले जाते, असे प्रतिपादन कामगार, भूकंप पुनर्वसन, कौशल्य विकास व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री  श्री. संभाजी  पाटील-निलंगेकर यांनी केले.
           भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री श्री. संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते जिल्हा क्रिडा संकुलाच्या प्रागंणात  मुख्य शासकीय ध्वजारोहण आज सकाळी ठीक 9 वाजून 15 मिनिटांनी झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पांडूरंग पोले, पोलीस अधिक्षक शिवाजी राठोड, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी महेशकुमार मेघमाळे, महानगरपालिका आयुक्त रमेश पवार, उपजिल्हाधिकारी (सा.) अनंत गव्हाणे, यांच्यासह सर्व शासकीय निमशासकीय विभाग प्रमुख, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक व पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.
 पालकमंत्री निलंगेकर पुढे म्हणाले की आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी  स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्याचा लढा झाला. या लढ्याचे भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत फार मोठे  योगदान आहे. याप्रसंगी भारतीय स्वातंत्र्यासाठी जीवन समर्पित केलेल्या आणि देशाच्या रक्षाणार्थ सीमेवर धारातीर्थी पडलेल्या जवानांना आपण सर्वजण मन:पुर्वक श्रध्दांजली अर्पण करून अभिवादन करु या ! तसेच देशाची, राज्याची व आपल्या जिल्ह्याची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी जागरुक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
 भारतीय प्रजास्ताक दिनाचा 67 वा वर्धापन दिन संपूर्ण देशभरात मोठया उत्साहाने साजरा केला जात आहे.  यानिमित्त आज येथे उपस्थित असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी, पालक व पत्रकार बांधवांना पालकमंत्री निलंगेकर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पालकमंत्री श्री. निलंगेकर यांना पोलीस पथकाकडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री निलंगेकर यांनी परेड कमांडर पोलीस उपअधिक्षक गणेश कींन्दे यांच्या समवेत परेड निरीक्षण केले व त्यानंतर परेड कमांडर किंन्दे यांच्या नियंत्रणाखाली परेडचे संचलन पार पडले. यामध्ये पोलीस स्टेशन कर्मचारी पथक, पोलीस मुख्यालय आर.सी.पी. पुरुष, पोलीस (प्रशिक्षणार्थी), होमगार्ड (पुरुष), पोलीस मुख्यालय (महिला), होमगार्ड (महिला), एन.सी.सी. (सिनीअर) मुले, छत्रपती शाहु महाराज सैनिक स्कुल उदगीर, एन.सी.सी. (ज्युनिअर) मुले, पोलीस बॅन्ड पथक, श्वान पथक, वज्र पथक, दंगा नियंत्रण वाहन, जल प्रतिसाद पथक या प्लाटूनचा सहभाग होता.
यावेळी शासनाच्या विविध विभागांमार्फत चित्ररथाच्या माध्यमातून आपआपल्या विभागाच्या योजनांच्या माहितीचे प्रदर्शन पालकमंत्री निलंगेकर यांच्या समोर सादर करण्यात आले. यात पोलीस विभागाचा महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानाचे महत्व सांगणारा चित्ररथ, तर आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागृती करणारा तसेच शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण व सरल योजनेचा शिक्षण विभागाचा चित्ररथ लक्ष वेधून घेत होते. योगा व आयुषच्या माध्यमातून सदृढ आरोग्याची माहिती देणारा आरोग्य विभागाचा तर बेटी बचाव बेटी पढाओ चा नारा घेऊन आलेला चित्ररथ समाजाला स्त्रीभृण हत्या थांबविण्याचा संदेश देत होता.  
शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाची माहिती सांगणारा कृषि विभागाच्या चित्ररथ ही वैशिष्ट्यपूर्ण होता. वातावरणातील बदलामूळे सततच्या टंचाईच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याने पाणी वाचवा धोरण या थीमवर तयार केलेला भूजल विभागाचा चित्ररथ पाणी काळजीने वापरण्याचा संदेश देत होता. सैनिक कल्याण विभाग, कौशल्य विकास, सामाजीक वनीकरण, महापालीका, अग्नीशमन विभाग, रोहयो, कामगार आयुक्त व राज्य परिवहन महामंडळ चित्ररथांनी  त्या-त्या विभागाच्या योजनांची माहिती दिली.
यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते पोलीस, क्रीडा, जिल्हा उद्योग केंद्र व सामाजीक वनीकरण विभागाच्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
पोलीस विभाग :- राष्ट्रपती पदक विजेते -1) अशोक बाबुराव गायकवाड, (2) जगन्नाथ देवीदास सुर्यवंशी (3) विद्याधर रंगनाथ टेकाळे या राष्ट्रपती पदक विजेत्यांचा सत्कार पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच पोलीस विभागाचे इतर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे नावे 1) ए.ए. अनत्रे, सह पोलीस निरीक्षक लातूर यांना गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ठ प्रयत्नासाठी पुरस्कार(प्रमाणपत्र व रोख रुपये 8000/- ), (2) एस. डी. शिंदे, पोलीस हवलदार लातूर यांना गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ठ प्रयत्नासाठी पुरस्कार(प्रमाणपत्र व रोख रुपये 8000/- ). (3) बी. टी. सोमवंशी, पोलीस हवलदार लातुर यांना गुणात्मक अन्वेषणासाठी सर्वोत्कृष्ठ प्रयत्नासाठी पुरस्कार(प्रमाणपत्र व रोख रुपये 8000/- ).
क्रीडा विभाग :-  (1)  शैलेश राजेंद्र शेळके, गुणवंत खेळाडू (पुरस्कार स्वरुप - स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम रुपये 10,000/-).  (2) जयराज मधुकरराव मुंढे, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक ( स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम रुपये 10,000/-). (3) लक्ष्मण शिवराज बेल्लाळे, गुणवंत क्रीडा संघटक, कार्यकर्ता  ( स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम रुपये 10,000/-).
जिल्हा उद्योग केंद्र विभाग :- (1) अण्णासाहेब बाळासाहेब चकोते, मे. अभिषेक फुड्स लातूर , जिल्हा पातळीवरील लघु उद्योजक पुरस्कार, प्रथम पुरस्कार (स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम रुपये 15,000/-). (2) अशोक गुंडेराव औरादकर, मे. एस जी आयर्न ॲन्ड स्टील वर्क्स , जिल्हा पातळीवरील लघु उद्योजक पुरस्कार, द्वितीय पुरस्कार (स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम रुपये 10,000/-).
सामाजीक वनीकरण विभाग :- सरस्वती विद्यालय लातूर , राष्ट्रीय हरीत सेना उत्कृष्ठरीत्या सहभाग बाबत प्रमाणपत्र.
सदानंद विद्यालय लातूरच्या झांज पथक व गोदावरी देवी लाहोटी कन्या विद्यालयाच्या पथकाने आपले सांस्कृतीक  कार्यक्रम सादर केले. तर शालेय विद्यार्थ्यांच्या कवायती व गीत गायनाचा कार्यक्रम ही झाला.
         यावेळी पालकमंत्री निलंगेकर यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक यांची भेट घेतली व त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच इतर ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांची भेट घेऊन सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. रामानुज रांदड, उद्धव फड व गणेश सरोदे यांनी केले.


                                                                     ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु