सर्व व्यापा-यांनी आर्थिक व्यवहार कॅशलेस पध्दतीने करावेत
                           खासदार डॉ. सुनील गायकवाड

          लातूर, दि. 3 : जिल्ह्यातील सर्व व्यापा-यांनी आपआपल्या व्यवसायाशी संबंधित सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार हे कॅशलेसच्या विविध पध्दतीचा अवलंब करुन पुर्ण करावेत, असे आवाहन लातूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी केले.
            येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित व्यापारी व बँक अधिका-यांच्या कॅशलेस व्यवहाराबाबतच्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी खासदार श्री.  गायकवाड बोलत होते. यावेळी मराठवाडा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संतोष गील्डा, सराफा असोसिएशन चे अध्यक्ष मोहन जाधव, उद्योजक शिवकुमार गवळी, गोविंद पारीक, रमेश सोनवणे, सुधीर जाधव व  सर्व राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
            खासदार गायकवाड पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंदीचा निर्णय घेतल्याने अर्थव्यवस्थेत कॅशलेसचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. कॅशलेस व्यवहार पध्दतीचा लातूर जिल्ह्यातील व्यापारी वर्गाने ही स्विकार केला असून त्या पध्दतीचा वापर मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी बँक अधिका-यांनी व्यापा-यांना सहकार्य करुन कॅशलेस व्यवहारांची माहिती द्यावी, असे त्यांनी सांगितले.
            तसेच सर्व बँक अधिका-यांनी व्यापारी व सर्वसामान्य लोकांना बँकेत आल्यानंतर सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कॅशलेस व्यवहाराची माहिती द्यावी. त्याप्रमाणेच कॅशलेस बाबतच्या त्यांच्या समस्या सोडवून त्यांना कॅशलेसचा व्यवहार करण्याबाबत प्रोत्साहित करावे असे खा. गायकवाड यांनी सांगितले. सर्व बँकांच्या अधिका-यांनी त्यांच्या बँकेच्या कार्यक्षेत्रात अथवा त्यांच्या खातेदारांसाठी कॅशलेसबाबत कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करण्याची सूचना श्री. गायकवाड यांनी केली. नोटाबंदीनंतर लातूर जिल्ह्यात कॅशलेसच्या पध्दतीने मोठ्या प्रमाणावर व्यवहार होत असले तरी जिल्ह्याच्या शेवटच्या घटकांतील लोकापर्यंत पोहोचून त्यांना सदरच्या व्यवहाराचे प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
          बँकांनी आपल्या बँकेच्या शाखेत कॅशलेस व्यवहाराच्या पध्दतीन, ॲप, इंटरनेट बँकीग आदिची माहिती मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेमध्ये जनतेसाठी उपलब्ध करुन द्यावी असे श्री. गायकवाड यांनी सांगितले.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु