‘अमृत’तर्फे महाराष्ट्रात दीपावलीमध्ये होणार विश्वविक्रमी दुर्गोत्सव

‘अमृत’तर्फे महाराष्ट्रात दीपावलीमध्ये होणार विश्वविक्रमी दुर्गोत्सव लातूर, दि. १४ (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्ग, गड यांचा सार्थ अभिमान अवघ्या भारत देशाला आहे. दर दिवाळी सणामध्ये बच्चेकंपनी मातीचे किल्ले बनवून छत्रपतींच्या कार्याचे स्मरण आणि अभिवादन करत असते. याच दुर्गांच्या प्रतिकृती साकारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात ‘अमृत’ ने दुर्गोत्सवाचे आयोजन या दीपावलीमध्ये केले आहे. हा एक विश्वविक्रम करण्याचा संकल्प अमृतने केला आहे. शिवछत्रपतींच्या पराक्रमांचे साक्षीदार असलेल्या 12 दुर्गांना युनेस्कोच्या जागतिक वारसाच्या वास्तूंमध्ये समाविष्ट करण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या प्रयत्नांना यश आले आणि साऱ्या महाराष्ट्राचा ऊर अभिमानाने भरुन आला. दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीमध्ये घरोघरी बालदोस्त आणि तरुण, ज्येष्ठ मंडळीसुध्दा दुर्गांच्या प्रतिकृती साकारतात. नागरिकांनी आपल्या अंगणात, बाल्कनीमध्ये, हाऊसिंग सोसायटीच्या सार्वजनिक जागांमध्ये या 12 दुर्गांपैकी कोणतीही एक हुबेहुब प्रतिकृती बनवावी आणि http://www.durgotsav.com या संकेतस्थळावर त्यासोबतचे सेल्फी पाठवावी. दुर्गोत्सवात सहभागी झालेल्या सर्वांच्या चित्रांचे संकलन केले जाईल. तसेच या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीने अभिनंदन पत्र पाठविण्यात येणार आहे. या बारा दुर्गांपैकी एक साकारा प्रतिकृती रायगड, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, साल्हेरदुर्ग, खंदेरीचा दुर्ग, जिंजी, पन्हाळगड, शिवनेरी, विजयदुर्ग, लोहगड, पद्मदुर्ग (सुवर्णदुर्ग). गडदुर्गचा आकार कमीत कमी दोन फुट असावा. जास्तीत जास्त कितीही असावा. सेल्फीमध्ये गडदुर्गचा जास्तीत जास्त भाग दिसावा. महाराष्ट्रात जास्तीत जास्त आबालवृध्दांनी गडदुर्ग बनवून, त्यासह सेल्फी काढून, दुर्गोत्सवाचे संकेतस्थळावर अपलोड करावी, असे आवाहन अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन