राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती


लातूर, दि. 10 (जिमाका): राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाद्वारे नागरिकांचे सशक्तीकरण या अभियानांतर्गत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा एस. एस. कोसमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गावांमध्ये कायदेविषयक शिबीर पार पडले. तसेच राष्ट्रीय विधी सेवा दिनाचे औचित्य साधून लातूर जिल्हा कारागृह येथे कैद्यांसाठी ‘हक हमारा भी तो है @75’ या अभियानाअंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले.  

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती एस. डी. अवसेकर या होत्या. अॅड. सुमेधा शिंदे, अॅड. अंजली जोशी, अॅड. छाया अकाते यावेळी उपस्थित होत्या.

अॅड. अकाते यांनी प्रथम खबर अहवाल, अटक, रिमांड या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. अॅड. शिंदे यांनी कैद्यांचे अधिकारबाबत, अॅड. जोशी यांनी कैद्यांचे मुलभूत अधिकार व कायदे या विषयावर मार्गदर्शन केले.

श्रीमती एस. डी. अवसेकर यांनी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणच्या आदेशान्वये हक हमारा भी तो है @75’ या अभियानाअंतर्गत कैद्यांना मार्गदर्शन केले. तसेच या उपक्रमाअंतर्गत कैद्यांना त्यांच्या विधीज्ञांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधता येणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी कैद्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

ग्रामीण भागामध्ये कायदेविषयक जनजागृती

भडी आणि ममदापूर गावात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत आयोजित शिबीरामध्ये ग्रामस्थांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. अॅड. सुनैना बायस, अॅड. सुजाता माने, विधी सेवक पृथ्वीसिंह बायस तसेच लातूर येथील दयानंद विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

अॅड. माने यांनी ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. अॅड. बायस यांनी बालकांचे व महिलांचे अधिकार याविषयी, श्री. बायस यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणविषयी माहिती दिली. तसेच मध्यस्थी, वैकल्पिक वाद निवारण पध्दती या विषयावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अॅड. माने यांनी केले, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती गिरी यांनी आभार मानले. यावेळी आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कार्यकर्त्या, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

दयानंद विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सोनवती, बोरी, शिउर, हरंगुळ बु., ममदापूर, पाखरसांगवी, काटगाव, भाडगाव, चिंचोलीराव, गंगापूर, चिचोली ब. या गावामध्ये जावून ग्रामस्थांना कायदेविषयक मार्गदर्शन केले.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु