जागतिक ऑटीझम दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांची प्रभातफेरीद्वारे मतदार जागृती
पथनाट्याद्वारे मतदारांना आवाहन; 12 शाळांतील 350 विद्यार्थ्यांचा सहभाग
लातूर, दि. 02 : जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने जागतिक ऑटीझम दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. माध्यमातून मतदानाचे महत्व पटवून देण्यासह लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
शहरातील 12 दिव्यांग शाळेतील 350 विद्यार्थ्यांनी विविध मतदान जनजागृतीचे फलक हाती घेवून प्रभातफेरीमध्ये सहभागी झाले होते. क्रीडा संकुलापासुन सुरू झालेल्या या प्रभातफेरीचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आदर्श आचारसंहिता कक्ष नोडल अधिकारी अनमोल सागर यांनी हिरवी झेंडी दाखवून केले. यावेळी स्वीप समितीचे नोडल अधिकारी नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, शिक्षणाधिकारी नागेश मापारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, स्वीप कक्षाचे रामेश्वर गिल्डा यावेळी उपस्थित होते.
जागतिक ऑटीझम दिनानिमित्त आयोजित ही प्रभातफेरी जिल्हा क्रीडा संकुलातून निघालेली ही प्रभात फेरी छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हा परिषद प्रांगणात आल्यानंतर या प्रभातफेरीचा समारोप झाला. यावेळी डॉ. योगेश निटूरकर यांनी ऑटीझम या व्यंगत्वावर मात कशी करता येईल, याविषयी माहिती दिली. यासह गरोदरपणात काय काळजी घ्यावी, तसेच विविध तपासण्या व उपचार करून यावर मात करता येईल, असे मार्गदर्शन केले.
प्रभातफेरीमध्ये सहभागी विद्यार्थिनींनी यावेळी पथनाट्य सादर करीत नागरीकांना मतदानाचे आवाहन केले. प्रभातफेरीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालयातील कार्यालय अधिक्षक रामचंद्र वंगाटे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता राजू गायकवाड, सहाय्यक सल्लागार बाळासाहेब वाकडे यांच्यासह दिव्यांग शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेततर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
जिल्हा परिषद इमारतीत मतदार जनजागृती थीमचे उदघाटन
जिल्हा परिषदेच्या इमारतीत उभारण्यात आलेल्या मतदार जनजागृती थीमचे उदघाटन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी फीत कापून केले. या थीम अंतर्गत स्वीप संकल्प, जेष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती मतदान जनजागृती, मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य, चुनाव का पर्व देश का गर्व या संकल्पना उभारण्यात आल्या आहेत. ही थीम तयार करणारे दिव्यांग शाळेतील कला शिक्षक शहाजी बनसोडे यांचेही जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी कौतुक केले.
प्रभात फेरीत विविध फलकांनी वेधले लक्ष
प्रभात फेरीमध्ये सहभागी मूकबधिर, गतिमंद , अंध, अस्थिव्यंग व बहुविकलांग विद्यार्थ्यांनी मतदान करण्यासाठी विविध फलके घेवून व घोषणा देवून जनजागृती केली. या विद्यार्थ्यांच्या हातातील फलकावर असलेल्या मतदानाचे महत्व विषद करणाऱ्या विविध घोषवाक्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
Comments
Post a Comment