लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राजकीय पक्ष प्रतिनिधींना विविध बाबींविषयी मार्गदर्शन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन

 

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये

राजकीय पक्ष प्रतिनिधींना विविध बाबींविषयी मार्गदर्शन

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन

लातूर, दि. 05 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष, उमेदवारांनी पालन करावयाचे नियमांसह इतर आवश्यक बाबींची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली नोंदणीकृत राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, निवडणूक खर्च नोंदी यासह इतर महत्वाच्या बाबींविषयी यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

अपर जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे आणि संगीता टकले, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे, लातूरच्य उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज असून राजकीय पक्ष, उमेदवार यांनीही भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. नामनिर्देशन पत्रे भरण्यापासून प्रचार विषयक नियम, निवडणूक खर्च सादर करण्याबाबतचे नियम आदी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. भारत निवडणूक आयोगामार्फत देण्यात आलेल्या निर्देशांचे आणि आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कदम यांनी राजकीय पक्षांच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दिलेले निर्देश, नियमावलीबाबत मार्गदर्शन केले. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी श्री. नेटके यांनी कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पालन करावयाच्या नियमांची माहिती दिली. उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे यांनी नामनिर्देशन पत्रे सादर करताना त्यासोबत द्यावयाची प्रमाणपत्रे, शपथपत्रे यासह इतर अनुषंगिक बाबींविषयी मार्गदर्शन केले. उपजिल्हाधिकारी संगीता टकले यांनी टपाल मतपत्रिकाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा निवडणूक खर्च संनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी अप्पासाहेब चाटे यांनी उमेदवारांनी निवडणूक खर्चाविषयी ठेवण्याच्या नोंदी आणि त्याबाबतच्या नियमांविषयी माहिती दिली.

*****





 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा