निवडणूक प्रचाराबाबत विविध परवानग्या देण्यासाठी लातूर पंचायत समिती येथे एक खिडकी कक्ष स्थापन
निवडणूक प्रचाराबाबत विविध परवानग्या देण्यासाठी
लातूर पंचायत समिती येथे एक खिडकी कक्ष स्थापन
लातूर, दि. 10 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषित झालेला असून 41-लातूर लोकसभा (अ.जा.) मतदारसंघाची निवडणूक 7 मे, 2024 रोजी घेण्यात येणार आहे. या अनुषंगाने 235- लातूर शहर मतदारसंघ अंतर्गत उमेदवारांना सभा, रॅली, पदयात्रा, पोस्टर, बॅनर इत्यादी विविध बाबींच्या परवानग्या देण्यासाठी एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. लातूर पंचायत समितीच्या पहिल्या मजल्यावर हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी दिली.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने उमेदवारांना प्रचाराच्या अनुषंगाने सर्व परवानग्या एकाच छताखाली मिळाव्यात, यासाठी लातूर शहर मतदारसंघा अंतर्गत एक खिडकी कक्ष लातूर शहर महानगरपालिका याठिकाणी करण्यात आलेला होता. परंतु, काही प्रशासकीय कारणास्तव हा कक्ष लातूर पंचायत समिती कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर स्थापन करण्यात आलेला आहे. या कक्षाच्या प्रमुख म्हणून लातूर शहर महानगरपालिका नगर रचनाकार श्रीमती निकीता भांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कक्षामध्ये पोलिस विभाग, आर.टी.ओ. विभाग, शहर स्थानिक प्रशासन, ग्रामीण स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी यांची देखील नेमणूक करण्यात आलेली असून उमेदवारांना एकाच ठिकाणी सर्व परवानग्या मिळणार आहेत. अर्ज सादर करताना संबंधित राजकीय पक्षांचे अध्यक्ष किंवा सचिव व उमेदवारांचे अधिकृत निवडणूक प्रतिनिधी किंवा स्वतः उमेदवार यांच्या सहीचाच अर्ज असावा. तसेच अर्ज पूर्ण भरलेला, विहीत नमुन्यात व आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह सादर केल्यानंतर 48 तासांच्या आत उमेदवारांना परवानगी मिळणार आहे. राजकीय पक्ष व उमेदवारांना 7 दिवस अगोदर अर्ज सादर करून परवानगी घेता येणार आहे.
एक खिडकीच्या अधिक माहितीसाठी लातूर शहर महानगरपालिका मालमत्ता व्यवस्थापक रवि कांबळे (भ्रमणध्वनी क्र. 9970964453) आणि लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रिय अधिकारी पवन सुरवसे (भ्रमणध्वनी क्र. 9595272692) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच एक खिडकी कक्षाचा जास्तीत जास्त उपयोग करण्याचे अवाहन श्रीमती रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment