लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त सूक्ष्म निरीक्षकांचे प्रथम प्रशिक्षण पूर्ण

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त

सूक्ष्म निरीक्षकांचे प्रथम प्रशिक्षण पूर्ण

लातूर, दि. 06 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी लातूर  मतदारसंघामध्ये  नियुक्त सूक्ष्म निरीक्षकांचे पहिले प्रशिक्षण शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झाले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

उपजिल्हाधिकारी संगिता टकले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियंका आयरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी आप्पासाहेब चाटे, नायब तहसिलदार पंकज मांदाडे यावेळी उपस्थित होते. सूक्ष्म निरीक्षकांना निवडणूक प्रक्रियेची माहिती, निवडणूक नियमांचे पालन कसे करावे आणि निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी घ्यावयाची काळजी, मॉकपोल कसे घ्यावे, याबाबत प्राथमिक प्रशिक्षण याप्रसंगी देण्यात आले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कदम यांनी सूक्ष्म निरीक्षकांची संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत महत्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगत मतदान कक्षात मतदान केंद्राध्यक्ष, निवडणूक अधिकारी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही करीत आहेत किंवा कसे, मतदान यंत्र सुस्थितीत व योग्यप्रकारे कार्यान्वित झाली आहेत का, मतदान केंद्रांवर किमान मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची खात्री सूक्ष्म निरीक्षकांनी करावी.

लोकशाही व्यवस्थेत मतदान प्रक्रियेला अतिशय महत्व आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी भारत निवडणूक आयोगाने विविध नियम केलेले आहेत. त्यानुसार मतदान प्रक्रिया पार पडत असल्याची खात्री सूक्ष्म निरीक्षकांनी करावी. तसेच भारत निवडणूक आयोगामार्फत नियुक्त निवडणूक निरीक्षकाचे प्रतिनिधी म्हणून सूक्ष्म निरीक्षक यांनी जबाबदारी पार पाडावी, असे सहायक निवडणूक अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे यांनी सांगितले.

उपजिल्हाधिकारी संगिता टकले यांनी टपाली मतदानाविषयी मार्गदर्शन केले. 85 वर्षांवरील मतदार तसेच 40 टक्क्यापेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग मतदार यांचे मतदान त्यांच्या घरी जावून पूर्ण करून घेण्यात येणार आहे. ही मतदान प्रक्रियाही सूक्ष्म निरीक्षक यांच्या निगराणीखाली होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणूक खर्च निरीक्षक अप्पासाहेब चाटे यांनी निवडणूक खर्च संनियंत्रणाच्या अनुषंगाने महत्वाच्या बाबींची माहिती दिली.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु