लातूर जिल्ह्यात गाव ते शहर झाला मतदान जागृतीचा जागर !

 लातूर जिल्ह्यात गाव ते शहर झाला मतदान जागृतीचा जागर !

·         ‘माझा एक दिवस मतदार जागृतीसाठी’ उपक्रम

·         महिला मतदार जागृतीसाठी जिल्ह्यात सर्वत्र एकाचवेळी रॅली

·         शहरी, ग्रामीण भागात सुमारे 20 हजार महिला, विद्यार्थिनींचा सहभाग

लातूर, दि. 08 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत ‘माझा एक दिवस मतदार जागृतीसाठी’ या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या निर्देशानुसार महिला मतदार जागृतीसाठी जिल्ह्यात एकाच वेळी ग्रामीण आणि शहरी भागात मतदार जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे 20 हजार महिला, युवती आणि विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. लातूर येथे झालेल्या रॅलीचा समारोप जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, जिल्हा स्वीप कक्षाचे नोडल अधिकारी तथा नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, महानगरपालिका उपायुक्त शुभम क्यातमवार, दयानंद महाविद्यालयाचे डॉ. दिलीप नागरगोजे, स्वीप आयकॉन शृष्टी जगताप, माही आरधवाड यांची यावेळी उपस्थिती होती.

लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. आपली लोकशाही बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बाजाविणे आवश्यक आहे. महिला मतदारांच्या मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र महिला मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या निवडणुकीत पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांच्या मतदानाची टक्केवारी अधिक रहावी, हा निश्चय करून महिला, युवतींनी इतर महिला मतदारांनाही मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी यावेळी केले.

लोकशाहीत निवडणुकीचे स्थान सर्वोच्च आहे. आपल्याला मिळालेला मतदानाचा हक्क बजावून प्रत्येक मतदाराने आपले कर्तव्य पार पाडावे. निवडणूक प्रक्रीये प्रत्येक मत हे अमुल्य आणि महत्वपूर्ण असल्याचे उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे म्हणाल्या.

लातूर जिल्ह्यात स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबवून नवमतदार ,महिला ,ट्रान्सजेन्डर ,भटके लोक यांच्या मतदार नांव नोंदणी बरोबर मतदान वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. 85 वर्षेपेक्षा अधिक वय असलेल्या जेष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना घरून मतदान करण्याची सुविधा यावेळी उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे यावेळी म्हणाले. जिल्ह्यातील महिला मतदारांची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत जिल्ह्यात गाव ते शहर सर्वत्र महिला मतदार जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

स्वीप आयकॉन शृष्टी जगताप, माही आधरवाड यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. दयानंद महाविद्यालय, शाहू महाविद्यालय आणि महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थिनी या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या.

लातूर जिल्ह्यातील प्रत्येक गावातून व शहरातून रॅलीच्या माध्यमातून महिला आणि विद्यार्थिनींनी मतदार जागृती केली. एकाच दिवशी संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात आलेली ही मोहीम लक्षवेधक ठरली. स्वीप समन्वयक  रामेश्वर गिल्डा राबसाहेब आंबरेविजय मालाळेडॉ. नितीन जायभाये, मधुकर टमालेगुरबस स्वामीऋषिकेश पवारअमित तुमकुटे यांनी रॅली यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

पोवाडा, पथनाट्यद्वारे मतदार जागृती

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत स्वीप उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत लातूर येथे आयोजित महिला मतदार जनजागृती रॅलीच्या समारोप प्रसंगी दयानंद महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संदिपान जगदाळे यांनी मतदार जागृतीचा पोवाडा सादर केला. तसेच विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे मतदानाचे महत्व पटवून दिले.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; पाटीवर लिहिले मतदार जागृतीचे संदेश

स्वीप उपक्रमांतर्गत जिल्ह्यात आयोजित महिला मतदार जागृती रॅलीमध्ये आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, शिक्षक यांच्यासह विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विविध घोषवाक्य लिहिलेले फलक हातात घेवून हे विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले होते. तसेच काही गावांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील पाटीवर मतदान जागृतीचे संदेश लिहून रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यासोबत विविध घोषणा देवून मतदारांना मतदानाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न यावेळी विद्यार्थ्यांनी केला.

****** 



Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु