महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पुर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पुर्व परीक्षा
केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
लातूर, दि. 27 (जिमाका) : महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पुर्व परीक्षा 2024 रविवार, दिनांक 1 डिसेंबर, 2024 रोजी सकाळी 10 वाजता ते दुपारी 12 पर्यंत व दुपारी 3 ते 5 पर्यंत दोन सत्रामध्ये आयोजित केलेली आहे. त्याअनुषंगाने निश्चित करण्यात आलेल्या परीक्षा केंद्राच्या परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
लातूर शहरात बार्शी रोड येथील दयानंद कॉलेज ऑफ कॉमर्स ॲन्ड बीसीए , अंबोजोगाई रोड लातूर येथील कॉलेज ऑफ कम्प्युटर सायंस अँन्ड इन्फॉरमेशन टेक्नालॉजी (कॉक्सिट), नांदेड रोड येथील यशवंत विद्यालय, जिजामाता कन्या प्रशाला, नारायण नगर येथील परिमल माध्यमिक विद्यालय, रिंगरोड येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कुल, श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालय, खाडगाव रोड येथील सरस्वती विद्यालय , शाहु चौक नांदेड रोड येथील ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजर्षी शाहु विज्ञान व कला महाविद्यालय, खाडगाव रोड येथील श्री.श्री. रविशंकर विद्यामंदिर , सिंग्नल कँम्प लातूर येथील श्री मारवाडी राजस्थान विद्यालय, खाडगाव रोड येथील श्रीमती सुशिलादेवी देशमुख महाविद्यालय , खाडगाव रोड येथील बसवन्नाप्पा वाले न्यु इंग्लिश मेडियम स्कुल, बार्शी रोड येथील दयानंद कला महाविद्यालय , श्याम नगर येथील श्री. केशवराज विद्यालय या उपकेंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा कालावधीत या परीक्षा केंद्रावर व परिसरात गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये जिल्हादंडाधिकारी वर्षा घुगे-ठाकूर यांनी परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्रितरित्या प्रवेश करता येणार नाही. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देता येणार नाहीत. परीक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल, असे कृत्य करता येणार नाही. 100 मीटरच्या परिसरातील झेरॉक्स सेंटर्स, पानटपरी, टायपींग सेंटर, एसटीडी बुथ, ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्युलर फोन, ई-मेल व इतर प्रसारमध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तींकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करता येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस, वाहनास प्रवेश मनाई राहील. हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी, कर्मचारी परीक्षार्थी केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्याबाबत त्यांचे परीक्षासंबंधी कर्तव्ये पार पाडण्याच्या अनुषंगाने लागू राहणार नाहीत.
*****
Comments
Post a Comment