लातूर तालुक्यात शेत रस्ते व पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी आज गातेगाव येथे 'सस्ती अदालत'चे आयोजन
लातूर तालुक्यात शेत रस्ते व पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी आज गातेगाव येथे 'सस्ती अदालत'चे आयोजन
लातूर, दि. 08 : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार आणि छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या परिपत्रकानुसार आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर तालुक्यातील शेत रस्ते, पाणंद रस्ते आणि शिव रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी 'सस्ती अदालत' आयोजित करण्यात येत आहे. यानुसार गातेगाव येथे सस्ती अदालत 9 मे 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत होणार आहे.
शेतकऱ्यांना जलद न्याय मिळावा आणि प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा व्हावा, यासाठ लातूर तहसील कार्यालयामार्फत 9 मे रोजी गातेगाव येथे होणाऱ्या सस्ती अदालतीत गारेगाव महसूल मंडळांतील अर्जांवर कार्यवाही होईल.
अतिक्रमित रस्त्यांबाबत अर्ज करण्याची सुविधा
लातूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांचे शेत रस्ते, पाणंद रस्ते किंवा शिव रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे, त्यांनी सस्ती अदालतीत उपस्थित राहून अर्ज दाखल करावेत.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
रस्त्याचा गाव, सर्व्हे नंबर/गट नंबर, अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे, गट नंबर आणि शक्य असल्यास त्यांचा मोबाइल क्रमांक नमूद करावा.
मागणी केलेल्या रस्त्याचा सर्व्हे नंबर/गट नंबर स्पष्टपणे नमूद करावा.
रस्ता वहीवाटीचा आहे, गाव नकाशावर किंवा सातबाऱ्यावर नोंद आहे का, याची माहिती द्यावी.
गाव नकाशाची उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, लातूर यांच्याकडील प्रमाणित प्रत जोडावी.
रस्ता केव्हा अडवला गेला, याचा तपशील द्यावा.
गैरअर्जदारांची नावे आणि पत्ते नमूद करावेत.
सातबारा उतारा, फेरफार नक्कल आणि संबंधित कागदपत्रे जोडावीत.
रस्त्याशी संबंधित प्रकरण कोणत्या न्यायालयात प्रलंबित आहे किंवा न्यायालयाचे आदेश आहेत का, याची माहिती द्यावी.समुपदेशनाद्वारे रस्ते मोकळे करण्याचा प्रयत्न
सस्ती अदालतीद्वारे शेतकऱ्यांचे रस्ते समुपदेशनाने मोकळे करण्यात येणार असून, सामान्य शेतकऱ्यांना तातडीने न्याय मिळावा, यासाठी लातूर तहसील कार्यालय प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment