जागतिक एड्स दिनानिमित्त १ डिसेंबर रोजी सायकल रॅली · १ ते १५ डिसेंबर या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन
जागतिक एड्स दिनानिमित्त १ डिसेंबर रोजी सायकल रॅली
· १ ते १५ डिसेंबर या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन
लातूर, दि. २८ (जिमाका) : महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्था व जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांच्या सूचनेनुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय यांच्यावतीने १ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ६.३० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक एड्स दिनानिमित्त एचआयव्ही, एड्स जनजागृतीसाठी होत असलेल्या या उपक्रमाचे घोषवाक्य ‘अडथळ्यांवर मात करून, एकजूटीने एचआयव्ही, एड्सला लढा देवू, नवं परिवर्तन घडवू’ असे आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून सायकल रॅलीला सुरुवात होईल. या रॅलीत लातूरमधील सायकल क्लब, विद्यार्थी, स्थानिक सामाजिक संस्था, मान्यवर व्यक्ती, शासकीय अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत. तसेच रॅलीच्या समारोप प्रसंगी रेड रिबन क्लब विद्यार्थीमार्फत जगजागृतीपर फ्लॅश मॉब कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या सायकल रॅलीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवहन जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
तसेच १ डिसेंबर, २०२५ रोजी दुपारी २ वाजता एचआयव्ही जीवन जगणाऱ्या ११ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर १ ते १५ डिसेंबर, २०२५ या कालावधीत जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये व्याख्याने, पोस्टर प्रदर्शन, विविध स्पर्धा, जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. अतिजोखीम गटातील व्यक्तींसाठी आरोग्य मेळावा व संवेदीकरण कार्यक्रम घेण्यात येणार आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी कळविले आहे.
****
Comments
Post a Comment