*महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना
2019:
*बाभळगाव व आष्टा येथील पात्र शेतकऱ्यांनी
तात्काळ आधार प्रमाणीकरण करून घ्यावे
-जिल्हाधिकारी
जी. श्रीकांत
*जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणास बाभळगाव व
आष्टा येथून प्रारंभ
लातूर,
दि. 24 :
जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणास
बाभळगाव ता. लातूर व आष्टा ता. चाकूर या दोन गावातील पात्र
शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करून योजनेचा पथदर्शक स्वरूपात
शुभारंभ करण्यात आला. या योजनेअंतर्गत बाभळगाव येथील 172 तर आष्टा गावातील 139
शेतकरी पात्र ठरलेले असून या शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालय, संबंधित
बँकेच्या शाखा, विविध कार्यकारी संस्था व आपले सरकार केंद्रावर लावण्यात आलेल्या
आहेत. तरी संबंधित पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण तात्काळ करून घेऊन
योजनेच्या लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती
योजनेअंतर्गत लातूर जिल्ह्यातील 64 हजार 158 शेतकऱ्यांची नावे संकेतस्थळावर आधार
क्रमांक सह जिल्ह्यातील संबंधित विविध बँकांकडून अपलोड करण्यात आलेली आहेत.
राज्यात या कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात 68 गावांचा समावेश असून त्यातील
दोन गावे लातूर जिल्ह्यातील असून आज पासून या गावातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ
देण्यास सुरुवात झालेली आहे. तसेच दिनांक 28 फेब्रुवारी 2020 पासून लातूर
जिल्ह्यातील उर्वरित सर्व गावातील पात्र लाभार्थ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ
देण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिली.
उपरोक्त दोन्ही गावातील तसेच उर्वरित गावनिहाय याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर यादीत
नाव असलेल्या पात्र शेतकऱ्यांनी आधार कार्ड व बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत सोबत
घेऊन गावातील बँकेच्या शाखेत अथवा आपले सेवा केंद्रावर घेऊन जाऊन आधार प्रमाणीकरण
करावे असे आवाहन त्यांनी केले.
बाभळगाव येथील 172 शेतकरी या कर्जमुक्ती योजनेत
पात्र असून आज येथील 15 शेतकऱ्यांनी आपलं आधार प्रमाणीकरण केले तर आष्टा ता चाकूर
येथील 139 पात्र शेतकऱ्यांपैकी 25 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून योजनेचा लाभ
मिळण्यास सहमती दर्शविली अशी माहिती जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी दिली. तसेच
राज्यात आजपासून पथदर्शक स्वरूपात योजनेचा लाभ देण्यास सुरुवात झालेली असून लातूर
जिल्ह्यातील बाभळगाव व आष्टा या दोन गावातील शेतकऱ्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश
झालेला असून जिल्ह्यातील उर्वरित सर्व गावातील पात्र लाभार्थ्यांना दिनांक 28
फेब्रुवारी पासून गावनिहाय याद्या प्रसिद्ध करुन आधार प्रमाणीकरनास सुरुवात
करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आष्टा
ता चाकूर:- येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत चाकूरचे सहाय्यक
निबंधक श्री जोगदंड यांच्या हस्ते आधार प्रमाणीकरण झालेल्या शेतकऱ्यास नोंदणी
पावती देण्यात आली तर बाभळगाव येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत शाखा
व्यवस्थापक श्री. उगिले यांच्या हस्ते आधार प्रमाणीकरण झालेल्या शेतकर्यांस
नोंदणी पावत्या देण्यात आल्या.
****
Comments
Post a Comment