राज्यात स्कूल ऑफ ड्रामाची स्थापना करणार

                      -सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

* राज्यात नवीन पाच बालनाट्य केंद्र सुरू करण्याची घोषणा; यातील एक बालनाट्य केंद्र लातुरात
* ग्रामीण भागातील कलाकारांना त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करणार
* बाल कलाकार स्वयम् शिंदे व सिद्धी देशमुख यांच्या हस्ते राज्य बाल नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उद्घाटन

लातूर, दि.17:- नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या धर्तीवर राज्यातील कलावंतासाठी महाराष्ट्र राज्य स्कूल ऑफ ड्रामाची स्थापना करण्याचा महत्वकांक्षी उपक्रम राबविण्यात येणार असून याबाबत कलावंतांनी आपल्या सूचना द्याव्यात असे आवाहन वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले.
सांस्कृतिक कला संचालनालयाच्या वतीने आयोजित 17 वी राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उद्घाटन प्रसंगी संस्कृतीक कार्यमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, प्रदीप पाटील खंडापूरे, ज्येष्ठ रंगकर्मी गिरीश सहदेव,  शैलेश गोजमगुंडे मनोज पाटील, बाल नाट्य परिषदेचे परीक्षक श्रीमती अरुंधती भालेराव, श्रीमती वीणा लोकूर, शंकर घोरपडे, प्रकाश पारखी, एकनाथ आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.
 सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख पुढे म्हणाले की, या राज्य स्कूल ऑफ ड्रामा मध्ये कलाकारांना कलेशी संबंधित सर्व प्रकारचे शिक्षण देण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत  जिल्हा व तालुका  पातळीवरील कलावंतांना पायाभूत सुविधा निर्माण करून दर्जेदार कला अविष्कार निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
  राज्याच्या ग्रामीण भागातील कलावंतांना त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळणे गरजेचे असून त्यादृष्टीने अलिकडेच प्रत्येक  जिल्हा मुख्यालयी कला केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या माध्यमातून कलावंतांना नक्कीच चांगले व्यासपीठ मिळेल असे श्री. देशमुख यांनी स्पष्ट केले.
राज्यात सध्या दहा ठिकाणी बाल नाट्य कला केंद्र सुरू आहेत. या बालनाट्य केंद्रातून अनेक बाल कलाकारांना प्रशिक्षित करण्याबरोबरच एक व्यासपीठ मिळवून दिले जाते. त्यामुळे राज्यात आणखी नवीन पाच बालनाट्य केंद्रे सुरू करण्यात येत असून त्यातील एक केंद्र लातूर येथेही सुरू करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची घोषणा श्री. देशमुख यांनी यावेळी केली.
या 17 व्या राज्य बालनाट्य अंतिम फेरीच्या स्पर्धेतील पात्र झालेल्या 24 नाटकांचे विषय पाहिले असता हे सर्व विषयी समाजात घडणाऱ्या घटनांचा एक परिपाक असून ते समाजाचे प्रतिबिंब दर्शवणारी आहेत. तसेच या स्पर्धेत एकूण 350 नाटके सादर झाले असून त्यातील 11500 कलाकारांनी आपला सहभाग नोंदविला आहे या सर्व सहभागी कलाकारांना सांस्कृतिक कला संचालनालयामार्फत सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल, अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली. त्याप्रमाणेच स्पर्धेतील विजेत्या नाटकाला 1 लाख, उपविजेते नाटकाला 60 हजार व तृतीय पुरस्कार प्राप्त नाटकाला 40 हजाराचे बक्षीस देण्यात येणार असून राज्य नाट्य स्पर्धा मध्ये काम करणाऱ्या परिवेक्षक, नाट्यकर्मी यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
          राज्यात राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धा घेण्याचा उपक्रम तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या कालावधीत सुरू झाला व आज या स्पर्धेची अंतिम फेरी लातूर येथे होत असल्याचा आपल्याला आनंद होत असल्याचे मत श्री देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले. 
राज्य बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी लातुरात होत असल्याने लातूरकरांना विविध नाट्याविष्कार पाहण्याची संधी प्राप्त झाली आहे,असे महापौर गोजमगुंडे यांनी सांगून नाट्य चळवळीची माहिती दिली. ज्येष्ठ रंगकर्मी गिरीष सहदेव यांनी लातुरात हौशी नाट्य स्पर्धा घेण्याची मागणी आपल्या मनोगतात केली.
           यावेळी नाट्यक्षेत्रातील कामगिरीबद्दल ज्येष्ठ नाट्यकर्मी गिरीश सहदेव तर मागील तीस वर्षांपासून नियमितपणे नाट्य स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या व बाल कलाकारांना घडवणाऱ्या सौ. सुनीता कुलकर्णी यांचा विशेष सत्कार सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
          प्रारंभी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते नटराज पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर या 17 वी बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उद्घाटन करण्याचा मान बालकलाकार स्वयम् शिंदे व सिद्धी देशमुख यांना सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या सूचनेनुसार देण्यात आला. ही स्पर्धा दिनांक वीस फेब्रुवारी पर्यंत होणार असून स्पर्धेत 24 बाल नाटिका सादर करण्यात येणार आहे. 
           या स्पर्धेत सादर होणारी वानरायण ही बालनाटिका अहमदनगरच्या बाल नाट्य आराधना ग्रुपने सादर केली। या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक अनंत जोशी आहेत. यातील कलाकारांनी मानवाकडून होणारी वृक्षतोड, त्यामुळे वन्यजीवांना होणारा धोका व त्यातून वन्यजीव मानवी वस्तीत येतात व मानवाकडून होणारा त्यांचा वध याबाबतचे सादरीकरण सादर केलेले आहे.
                                                   *****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु