जिल्ह्यातील सर्व शाळांनी मराठी भाषेच्या
संवर्धनासाठी वर्षभर उपक्रम राबवावेत
- शिक्षणाधिकारी वैशाली जामदार
* मातृभाषेतून मिळणारे शिक्षण हेच खरं शिक्षण
* जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्री विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा
लातूर,
दि.27:- मातृभाषेतून मिळालेले शिक्षण हेच खरं शिक्षण असून महाराष्ट्रात जन्माला
आलेलं प्रत्येक मूल हे सुरुवातीचं अक्षर मराठीतूनच म्हणत असतं. मातृभाषाच
आपल्याला समृद्ध करत असते. मुलांनी लहान वयातच लिहायला वाचायला आणि आपल्या
आई-वडिलांप्रमाणे मातृभाषेला ही जपायला हवं . शाळांनी फक्त मराठी भाषा दिनादिवशीच
नाही तर
वर्षभर असे मराठी भाषेच्या संवर्धनासाठीचे उपक्रम राबवायला हवेत अशाही अपेक्षा अध्यक्षीय
समारोपात शिक्षणाधिकारी (प्रा.) डॉ. वैशाली जामदार यांनी व्यक्त केली.
जिल्हा
प्रशासनाच्या वतीने श्री विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
यावेळी अध्यक्षस्थानावरून शिक्षणाधिकारी जामदार बोलत होत्या. प्रमुख
वक्ते म्हणून ज्येष्ठ साहित्यिक तथा कवी रमेश चिल्ले हे उपस्थित असून मंचावर लातूर
जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे, जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे
उपशिक्षणाधिकारी विशाल दशवंत, समग्र शिक्षा अभियानाचे जिल्हा समन्वयक तथा
साहित्यिक विवेक सौताडेकर ,श्री शैक्षणिक संकुलाचे सचिव प्रा .डॉ. दिलीप गुंजरगे ,
श्री विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. मनीषा शिंदे(गुंजरगे), प्राचार्य विनायक
माने , वैजनाथ घाटके , माहिती कार्यालयाचे आश्रूबा सोनवणे आदी उपस्थित होते.
कवी
रमेश चिल्ले यांनी आपल्या 'खोपेगाव ' , 'पुस्तकं' , 'पास होण्याचा मंत्र' , 'बाबा
सांगायचे गोष्ट' परीक्षा ' अशा विविध सुंदर कवितांच्या माध्यमातून मुलांना बोलते
केले. स्वतः कविता गायल्या आणि आणि एका सुरात विद्यार्थ्यांनाही गायला लावल्या.
शिवाय मधोमध मराठी भाषा ही आपली आई असून मराठी भाषेवर इंग्रजीचे सावट आले असून
मराठी भाषा संकटात आहे. तेव्हा माय मराठीच्या संवर्धनाची सर्वतोपरी जबाबदारी ही
आपल्यावर आहे. संवर्धनाची जबाबदारी.आज जे मराठी भाषेचे वैभव
आहे ते केवळ ग्रामीण भागातील बोली भाषांमुळेच टिकून असून सर्व विद्यार्थ्यांनी
साहित्य वाचनाकडे वळावे ,कवी आणि लेखक व्हावे असेही आवाहन याप्रसंगी केले.
जिल्हा
ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे म्हणाले की, ग्रंथालये ही मराठी भाषेचा आत्मा
असतात, तेव्हा मुलांनी पुस्तक वाचनाकडे वळले पाहिजे .पुस्तक वाचनाने माणूस समृद्ध
होईल आणि मराठी भाषा टिकू शकेल असे मत व्यक्त केले. तसेच याप्रसंगी श्री शाळेतील
बालकवी आणि कवयित्री यांनी स्वरचित कवितांचे सादरीकरण
केले.त्याचबरोबर मराठी भाषेचे महत्व सांगणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार
केलेल्या भित्ती पत्रिकेचे विमोचन याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.ज्या
विद्यार्थ्यांनी भित्ती पत्रिका तयार करण्यात व कविता गायनात सहभाग नोंदवला अशा
विद्यार्थ्यांचा याप्रसंगी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी शासनाने
दिलेल्या भाषा प्रतिज्ञेचे शिक्षणाधिकारी व उपस्थित सर्व मान्यवर ,शिक्षकवृंद व
विद्यार्थी यांच्याकडून सामूहिक वाचन करण्यात आले.
जिल्हाधिकारी
कार्यालय, लातूर व जिल्हा परिषद ,लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने "मराठी
भाषा गौरव दिन " विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. ज्येष्ठ कवी वि. वा.
शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये मोलाचे
योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक्
परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून वि. वा .शिरवाडकर उर्फ
कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय
शासनाने यापूर्वीच घेतला आहे .
त्याच अनुषंगाने यावर्षी जिल्हा स्तरावर
शासनाकडून एक समिती नेमण्यात आली होती. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी हे असून
सदस्य सचिव शिक्षणाधिकारी प्राथमिक हे
आहेत तर मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद, जिल्हा माहिती अधिकारी व जिल्हा
ग्रंथालय अधिकारी हे समितीचे सदस्य आहेत.या समितीच्या वतीने मराठी भाषा व साहित्य
वृद्धिंगत होण्यासाठी पूरक असे विविध उपक्रम लातूर येथील वैभव नगर परिसरात
असलेल्या श्री शाळेत आयोजित करून समारंभपूर्वक हा सोहळा साजरा
करण्यात आला. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून "मराठी भाषा: संवर्धन काळाची
गरज" या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक सौताडेकर यांनी केले असून प्रास्ताविकात मराठी
भाषेचे महत्व आणि शासनाचा मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचा उद्देश स्पष्ट केला.
कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापिका सौ. मनीषा शिंदे (गुंजरगे ) यांनी मानले.
|
Comments
Post a Comment