जागतिक पर्यावरण दिनी लातूर जिल्ह्यात वृक्षारोपण मोहिमेसह स्वच्छता अभियानाचे आयोजन • जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांचे आवाहन
जागतिक पर्यावरण दिनी लातूर जिल्ह्यात वृक्षारोपण मोहिमेसह स्वच्छता अभियानाचे आयोजन
• जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांचे आवाहन
लातूर, दि. २ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येत्या ५ जून २०२६ रोजी लातूर जिल्ह्यात वृक्षारोपण मोहिमेसोबतच स्वच्छता अभियानही राबविण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये शासकीय यंत्रणांसोबतच स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. तसेच जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापनासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.
वृक्षारोपण व स्वच्छता मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला लातूर शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, सामाजिक वनीकरण विभागाचे उपवन संरक्षक अमितराज जाधव, सहायक वनसंरक्षक मदन क्षीरसागर, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मोहन अभंगे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी व नगरपालिका, नगरपंचायतींचे मुख्याधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
घनकचरा व्यवस्थापनाविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार लातूर जिल्हास्तरावर आता विशेष कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील घनकचरा व्यवस्थापनाचे थेट संनियंत्रण केले जाईल. महानगरपालिका, नगरपालिका ते थेट ग्रामपंचायत अशा सर्वच स्तरावर घनकचरा निर्माण होणाऱ्या आस्थापना आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी स्पष्ट केले.
येत्या ५ जून रोजी सकाळी लातूर शहरासह जिल्ह्यातील सर्वच नगरपरिषद, नगरपंचायती आणि मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात यावे. या मोहिमेत शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबतच स्वयंसेवी संस्था व स्थानिक नागरिकांना सक्रियपणे सहभागी करून घेण्यासाठी प्रशासनाने आवाहन करावे. केवळ वृक्षारोपण न करता लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी सर्व शासकीय विभाग आणि वन विभागाने दक्ष राहावे. पर्यावरण संवर्धनाला गती देण्यासाठी जिल्ह्यात 'सिंगल युज प्लास्टिक' वापराला प्रतिबंध करण्याची मोहीम अधिक तीव्र करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. प्रशासकीय स्तरावर या सर्व मोहिमांचे नियोजन करण्यात येत असून, लातूर जिल्हा पर्यावरणपूरक व स्वच्छ बनवण्यासाठी स्वयंसेवी संस्था व पर्यावरण प्रेमी नागरिकांनीही आपले योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
Comments
Post a Comment