राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत मूल्यसाखळी भागीदार निवडीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून प्रस्ताव आमंत्रित
राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत मूल्यसाखळी भागीदार
निवडीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून प्रस्ताव आमंत्रित
लातूर, दि. ०३ : जिल्ह्यातील सोयाबीन, करडई, तीळ, भुईमूग आणि सूर्यफूल या प्रमुख तेलबिया पिकांच्या शाश्वत विकासासाठी राष्ट्रीय खाद्यतेल अभियान–तेलबिया सन २०२६-२७ अंतर्गत पीकनिहाय मूल्य साखळी भागीदार म्हणून पात्र शेतकरी उत्पादक कंपन्यांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लातूर जिल्हा तेलबिया समितीमार्फत निवडल्या जाणाऱ्या या भागीदार संस्थांना अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण देणे, प्रमाणित बियाणे वितरण करणे, शेतकरी शेतीशाळा चालवणे, मूल्यसाखळी समूहातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे माती परीक्षण करणे आणि 'कृषी मॅपर' पोर्टलवर लाभार्थ्यांची अचूक माहिती भरणे यांसारखे महत्त्वपूर्ण घटक व उपक्रम राबवावे लागणार आहेत.
या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक कंपन्या किंवा संस्था कंपनी कायदा अथवा सहकारी कायद्यांतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक असून, संबंधित तालुक्यात काम करण्याचा त्यांना किमान ३ वर्षांचा अनुभव असावा म्हणजेच त्यांची नोंदणी माहे मार्च २०२३ पूर्वीची असणे बंधनकारक आहे. यासोबतच संबंधित शेतकरी उत्पादक कंपनी किंवा सहकारी संस्थेमध्ये किमान २०० शेतकरी सभासद म्हणून नोंदणीकृत असावेत, सहकारी संस्था असल्यास तिच्या उद्दिष्टामध्ये तेलबिया पिकांशी संबंधित कामकाजाचा स्पष्ट उल्लेख असावा आणि मागील ३ वर्षांतील त्यांची सरासरी वार्षिक उलाढाल ९ लाख रुपयांपेक्षा जास्त असावी. शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये शेतकऱ्यांचा किमान ३ लाख रुपयांचा समभाग असावा तसेच कमी उत्पादकता असणाऱ्या तालुक्यांमध्ये कार्यरत असलेल्या, सरकारकडून आधीच अनुदान प्राप्त झालेल्या आणि केंद्र सरकारच्या १० हजार शेतकरी उत्पादक संघ योजनेअंतर्गत किंवा नाफेड व एनएससी-ओएस सारख्या सार्वजनिक संस्थांकडे नोंदणीकृत असलेल्या तेलबिया क्षेत्रातील कंपन्यांना या निवड प्रक्रियेत विशेष प्राधान्य दिले जाईल.
तरी उपरोक्त सर्व पात्रता व निकष पूर्ण करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील इच्छुक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह संबंधित तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे १५ जून २०२६ रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment