जुन्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी ३० जून २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ

जुन्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी ३० जून २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ · १ जुलैपासून 'वायुवेग पथका'द्वारे होणार कडक कायदेशीर कारवाई लातूर, दि. ०१ : जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसवण्यासाठी यापूर्वी दिनांक ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, परंतु अद्यापही राज्यातील अनेक वाहनांवर एचएसआरपी प्लेट्स बसवल्या नसल्याचे आढळून आल्यामुळे प्रशासनाने आता या जुन्या वाहनांना क्रमांक पाटी बसविण्यासाठी ३० जून २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतिम मुदतीनंतर, म्हणजेच ०१ जुलै २०२६ पासून एचएसआरपी प्लेट न बसविणाऱ्या सर्व जुन्या व नव्या वाहनांवर 'वायुवेग पथकाद्वारे' कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, मात्र ज्या वाहन मालकांनी ३० जून २०२६ पर्यंत एचएसआरपी प्लेट बसवण्यासाठी पुढील अपॉइंटमेंट घेतली आहे, अशा वाहनांवर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये असे स्पष्ट करण्यात आले आहे. परिवहन आयुक्त यांच्या कार्यालयीन परिपत्रकानुसार, एचएसआरपी प्लेट न बसविणाऱ्या वाहन मालकांचे वाहन हस्तांतरण आणि वित्त बोजा चढविणे किंवा उतरविणे इत्यादी कामांवर आधीच निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यापुढे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची पुनर्नोंदणी, वाहनात बदल करणे आणि परवाना नूतनीकरण इत्यादी सर्व महत्त्वाची कामे (योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण वगळून) थांबविण्यात यावीत, असे निर्देश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, वाहनधारकांनी मुदतीनंतर होणारी कायदेशीर कारवाई आणि प्रशासकीय अडचणी टाळण्यासाठी आपल्या वाहनांवर एचएसआरपी प्लेट बसविण्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन लातूर प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत