लातूर जिल्ह्यात एकाच दिवसात रोखले तीन बालविवाह

लातूर, दि. 20 (जिमाका) : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने 18 मार्च 2023 रोजी एकाच दिवशी जिल्ह्यातील तीन बालविवाह रोखले. चाईल्ड लाईन आणि इतर माध्यमातून या बालविवाहांची माहिती मिळताच महिला व बाल विकास अधिकारी देवदत्त गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ संबंधित पालकांचे समुपदेश, कायदेविषयक माहिती देवून हे तिन्ही बालविवाह रोखले.

 रेणापूर तालुक्यातील पळशी येथील एका अल्पवयीन बालिकेचा विवाह चाकूर तालुक्यातील वडवळ येथे होणार असल्याची माहिती 18 मार्च रोजी सकाळी सहा वाजता चाईल्ड लाईनचा टोल फ्री क्रमांक 1098 वर मिळाली. महिला व बाल विकास विभागाच्या पथकाने तत्काळ विवाहस्थळी जावून बालिकेचे आई-वडील आणि मुलाचे आई-वडील व इतर नातेवाईक यांचे समुपदेशन करून बालविवाह हा कायदेशीर गुन्हा असल्याचे सांगितले. तसेच या गुन्ह्यातील तरतुदीची माहिती दिली.

 हा बालविवाह रोखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी निकेतन कदम, चाकूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक पी. एम. मोहिते, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी सीताराम कांबळे, पोलीस  हेड कॉन्स्टेबल श्री. आर. एम वाघमारे,  पोलीस कॉन्स्टेबल जी. यु. बोळंगे यांच्या संयुक्त पथकाने कार्यवाही केली. बाल कल्याण समितीच्या सदस्य संगीता महालींगे यांच्यासमोर बालिकेला सादर केल्यानंतर त्यांनी अठरा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय बालिकेचा विवाह लावू नये, असे आदेश देवून तिला पालकांच्या ताब्यात दिले.

 देवणी तालुक्यातील बामणी येथील अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती 18 मार्च रोजी मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने विवाहस्थळी जावून बालिकेच्या पालकांचे समुपदेशन करून बालविवाह रोखला. तसेच ही बालिका नांदेड जिल्ह्यातील असल्याने तिला नांदेड जिल्ह्यातील बाल कल्याण समिती समोर हजर राहण्याची नोटीस बजाविण्यात आली. या कार्यवाहीमध्ये हेड कॉन्स्टेबल नरेश उस्तुर्गे, सरपंच राजकुमार बिरादार, चाईल्ड लाईनच्या समन्वयक अश्विनी मंदे, बापू सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.

 तिसऱ्या प्रकरणात औसा तालुक्यातील बुधोडा येथील एका अल्पवयीन बालिकेचा विवाह होणार असल्याची माहिती चाईल्ड लाईनच्या 1098 या टोल फ्री क्रमांकावर प्राप्त झाली. माहिती मिळताच महिला व बाल विकास विभागाच्या पथकाने विवाहस्थळी जावून बालिकेच्या आई-वडिलांचे समुपदेशन केले. बालविवाह हा गुन्हा असून त्यामुळे होणारी शिक्षा, तसेच बालविवाहामुळे बालिकेच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दिली. या कार्यवाहीमध्ये पोलीस कॉन्स्टेबल पी. जी. भीमनवाद, एस. जी. होगाडे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कर्मचारी सीमा इंगळे यांच्या संयुक्त पथकाने केली.

 जिल्हा परीविक्षा अधिकारी गजानन सेलूकर, धनंजय जवळगे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी धम्मानंद कांबळे, बाल कल्याण समिती अध्यक्ष राधाकृष्ण देशमुख यांनी या तिन्ही बाल विवाह रोखण्याच्या कार्यवाहीत महत्वाची भूमिका बजाविली.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु