पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आदेश अन् मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मिळाली तातडीने मदत


·       मृत नागभूषण पाटील यांच्या वारसांना चार लाखांचा धनादेश सुपूर्द

 लातूर, दि. 20 (जिमाका) : शनिवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री गिरीश महाजन यांना चाकूर तालुक्यातील तीर्थवाडी येथील शेतकरी नागभूषण पाटील यांचा वीज कोसळून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. त्यावेळी त्यांनी पाटील कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. तसेच शासनाकडून देण्यात येणारी मदत तातडीने देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. याअनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या होत्या. त्यानुसार तत्काळ कार्यवाही होवून आज (दि. 20)  पाटील कुटुंबियांना चार लाख रुपयांचा सानुग्रह अनुदानाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

 अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन शनिवारी लातूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत नुकसानीचा आढावा घेवून सायंकाळी रेणापूर तालुक्यातील रामवाडी आणि पानगाव फाटा येते शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांना चाकूर तालुक्यातील तीर्थवाडी येथील शेतकरी नागभूषण विश्वनाथ पाटील यांचा 17 मार्च रोजी वीज कोसळल्याने मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पालकमंत्री श्री. महाजन यांनी तत्काळ पाटील कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. यावेळी परिवारातील सदस्यांशी चर्चा करताना शासनामार्फत तातडीने मदत देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

 शासनामार्फत देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानाची रक्कम पाटील कुटुंबियांना तातडीने देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. महाजन यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार तत्काळ आवश्यक कार्यवाही करून 20 मार्च रोजी उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी मयत शेतकरी नागभूषण पाटील यांच्या वारसांना चार लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, गणेश हाके व नागरिक यावेळी उपस्थित होते.

******

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु