अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये मिळणार प्रवेश

 ·       30 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

 लातूर, दि. 31 (जिमाका): सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात औरंगाबाद, जालना, बीड व लातूर या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना इयत्ता पहिलीमध्ये शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी 30 एप्रिल 2023 पर्यंत परिपूर्ण प्रवेश अर्ज औरंगाबाद एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन औरंगाबाद येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती देवकन्या बोकडे यांनी केले आहे.

 विद्यार्थी अनुसूचित जतातीचा असावा. अर्जासोबत अनुसूचित जमातीच्या दाखल्याची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. विद्यार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यास त्यासंबंधित प्रमाणपत्राची छायांकित प्रत व द्रारिद्रय रेषा अनुक्रमांक नमूद करावा. विद्यार्थ्यांच्या पालकाची उत्पन्न मर्यादा ही एक लाख एवढी असून यासाठी सक्षम अधिकाऱ्याने  दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र जोडावे. तसेच अर्जासोबत  पालकांनी  संमतीपत्र देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, दोन पासपोर्ट साईजचे फोटो, जन्म तारखेचा पुरावा व वैद्यकिय अधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. या योजनेत आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना तसेच विधवा, घटस्फोटित, निराधार व दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील पाल्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

 विद्यार्थ्याचे पालक शासकिय, निमशासकिय नोकरदार नसावेत. प्रकल्प कार्यालयात विहित नमुन्यातील  प्रवेश अर्ज विनामुल्य उपलब्ध असून हे अर्ज परिपूर्ण भरून आवश्यक कागदपत्रांसह 30 एप्रिल 2023 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांवर होणारा संपूर्ण खर्च आदिवासी  विकास विभाग करणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी  प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी  विकास प्रकल्प, रिलायन्स मॉलच्या पाठीमागे, गारखेडा परिसर, औरंगाबाद येथे संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती बोकडे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु