शासनाच्या विविध योजनांचा लाभ देवून

भटक्या विमुक्तांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न

-         जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

·        मुरुड येथे शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी शिबीर

लातूर, दि. 5 (जिमाका): शासनाच्या निर्देशानुसार विमुक्त जाती व भटक्या जमाती, आदिवासी जमातीमधील वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ देवून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणले जाणार आहे. यासाठी राज्य लातूर जिल्ह्यात अशा घटकांना विविध शासकीय योजना, प्रमाणपत्रे वितरीत करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. मुरुड येथे विमुक्त जाती व भटक्या जमाती, आदिवासी जमातीमधील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी महाराजस्व अभियान अंतर्गत आयोजित शिबिरात त्या बोलत होत्या.

सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्तेलातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळेतहसीलदार सौदागर तांदळे, मुरुडच्या सरपंच अमृता नाळे, उपसरपंच हनमंत नागटिळक, नायब तहसीलदार गणेश सरोदे, भटके विमुक्त विकास परिषदेचे नरसिंह झरे यावेळी उपस्थित होते. यावेळी वडार, पारधी, मांग गारुडी, डवरी गोसावी, बंडी धनगर, कैकाडी, वासुदेव, मसण जोगी, वैदू समाज समाजातील सुमारे 300 कुटुंबे यावेळी उपस्थित होती. सर्व समाज घटकांना यावेळी व्यासपीठावर प्रतिनिधित्व देण्यात आले होते.

अनेकदा आवश्यक कागदपत्रे नसल्याने विमुक्त जाती व भटक्या जमातीमधील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे अशा नागरिकांना प्रथम आधारकार्ड, रेशनकार्ड, राष्ट्रीयत्व दाखला, उत्पन्नाचा दाखला यासारखे प्रमाणपत्र उपलब्ध करून देवून त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येत आहे. सतत भटकंती आणि संघर्षमय जीवन जगणाऱ्या या घटकाला त्यांच्या पालापर्यंत, घरापर्यंत पोहचून योजनांची माहिती देवून त्यासाठी त्यांचे अर्ज भरून घेतले जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून विमुक्त जाती व भटक्या जमाती, तसेच आदिवासी जमातीमधील घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या.

भटक्या, विमुक्तांना शासनाच्या योजनांचा लाभ देवून त्यांच्या विकासासाठी राज्य शासन आणि प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नाचे भटके विमुक्त विकास परिषदेचे नरसिंह झरे यांनी कौतुक केले. तसेच आतापर्यंत शासकीय योजनांच्या लाभापासून दूर असलेल्या भटक्या, विमुक्त घटकांना योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यासह राज्यभर शिबिरे होत असल्याचे त्यांनी सांगितले.

विमुक्त जाती व भटक्या जमातीमधील नागरिकांना महसूल विभागामार्फत शासकीय प्रमाणपत्रे, विविध दाखले आणि शासनाच्या योजनाचा लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी या घटकातील कुटुंबांचा सर्वे करण्यात आला असून प्रत्येकाला योजनांचा लाभ देण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी सांगितले.

घरकुल योजना, आधार नोंदणी, मतदार नोंदणी, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निराधार योजनेचे अर्ज यावेळी भरून घेण्यात आले. तसेच उत्पन्न दाखले, रेशनकार्ड, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, अंत्योदय योजनेतून साडी, विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी आयोजित आरोग्य शिबिरात उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधीचे वाटप करण्यात आले.

प्रास्ताविक उपसरपंच हनमंत नागटिळक यांनी केले. बहुरूपी कला सादर करणारे मोहन सगर, सुनील साळुंखे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

*****







Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु