जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित

सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

·        जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दाखविली हिरवी झेंडी

·        जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, ‘आयएमए’कडून आयोजन

·        महिलांनी आरोग्याच्या बाबतीत जागृत राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन

लातूर, दि. 8 (जिमाका): जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लातूर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय आणि लातूर आयएमए वूमन्स डॉक्टर विंगच्यावतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून रॅलीला सुरुवात झाली.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, उपशिक्षणाधिकारी श्री. क्षीरसागर, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल राठी, वूमन्स डॉक्टर विंगच्या अध्यक्ष डॉ. प्रीती बादाडे, डॉ. प्रियांका राठोड, डॉ. अशोक सारडा, डॉ. पाठक, लातूर सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष विष्णू मदने, सचिव संदेश महिंद्रकर, सायकल बड्डीजचे विकास कातपुरे, मॉम्स ऑन व्हीलच्या डॉ. विमल डोळे यावेळी उपस्थित होत्या.

स्त्री भ्रूणहत्या विरोधी जनजागृती, सुरक्षित मातृत्व व महिलांच्या आरोग्याबाबत संदेश देण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. देशिकेंद्र विद्यालय, केशवराज विद्यालयातील विद्यार्थिनी, ज्ञानप्रकाश बालविकास केंद्राचे ढोल पथक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून पीव्हीआर चौक, महात्मा गांधी चौक ते पुन्हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे आल्यानंतर रॅलीचा समारोप झाला.

शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे प्रत्येकासाठी महत्वाचे आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या जबाबदाऱ्या सांभाळताना आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. आरोग्याचे महत्व पटवून देण्यासाठी आयोजित सायकल रॅलीमुळे महिलांमध्ये जनजागृती होईल. त्यामुळे त्यांच्या आरोग्य आणि प्रगतीचे चाक गतिमान होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केला. तसेच महिलांनी आयुष्यात आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला येणाऱ्या चांगल्या-वाईट अनुभवासह खंबीरपणे वाटचाल करावी, असे त्यांनी सांगितले.

समाजाची प्रगती ही महिलांच्या प्रगतीशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे महिलांच्या प्रगतीसाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी प्रास्ताविकात सांगितले. तसेच रॅलीच्या आयोजनाचा हेतू त्यांनी विषद केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आंनद कलमे यांनी केले. डॉ. माधुरी उटीकर, अॅड. श्रीमती मेकले, जयश्री सागावे, अनिल कुंभारे, दिपक पवार, संध्या शेडोळे, हिराकांत थिटे, कैलास स्वामी  यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

*****






Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा