लातूरच्या पथदर्शी कामाचा इतर जिल्हयांनी आदर्श घ्यावा

   - विभागीय आयुक्त श्री. मधुकर राजे अर्दड

ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या पुरस्काराचे वितरण

 

छत्रपती संभाजीनगर,दि. 5 (विमाका):- लातूर जिल्हयाने टीमवर्कच्या माध्यमातून विविध क्षेत्रात चांगले काम केले आहे. मराठवाडयातील इतर जिल्हयांनीही लातूरच्या पथदर्शी कामाचा आदर्श घ्यावा, लातूरप्रमाणेच आपल्या जिल्हयातही पथदर्शी काम उभे करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त श्री. मधुकर राजे अर्दड यांनी केले.

 

विभागीय आयुक्त कार्यालयात ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने 2020-21 व 2022-23 या वर्षातील विभागस्तरीय पुरस्काराचे वितरण विभागीय आयुक्त श्री. अर्दड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अनमोल सागर, उपायुक्त सुरेश बेदमुथा, डॉ. सीमा जगताप आदी उपस्थित होते.

 

यावेळी विभागीय आयुक्त श्री. अर्दड म्हणाले, लातूर जिल्हा शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत नेहमीच अग्रेसर राहीला आहे. गुड गर्व्हर्नसमध्येही जिल्ह्याने पथदर्शी काम केले आहे. लातूरचा एक पॅटर्न आहे. शिक्षण क्षेत्रासोबतच लातूर जिल्हयाने टीमवर्कच्या माध्यमातून विविध क्षेत्रात चांगले काम केले आहे. मराठवाडयातील इतर जिल्हयांनीही लातूरच्या पथदर्शी कामाचा आदर्श घेत आपल्या जिल्हयातही पथदर्शी काम उभे करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

पंचायतराज व्यवस्थेत पुरस्कार प्राप्त स्थानिक स्वराज्य संस्थांचा गौरव करून श्री. अर्दड म्हणाले,  मराठवाडयात  पंचायतराज व्यवस्थेत चांगल्या पध्दतीने काम सुरू आहे. पर्यावरण क्षेत्रात कामाची गरज असून यासाठी सर्वांचा सहभाग महत्वाातचा आहे. पर्यावरणाचा समतोल जपला गेला पाहीजे. गावशिवारात हिरवाई जपण्यासोबतच पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रत्येक घटकाने पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

2020-21 विभागीय स्तर प्रथम क्रमांक पंचायत समिती लातूर रू. 11 लक्ष, द्वितीय क्रमांक पंचायत समिती नांदेड रू. 8 लक्ष, तृतीय क्रमांक पंचायत समिती शिरूर अनंतपाळ, जि. लातूर रू.6 लक्ष. धनादेश आणि स्मृतीचिन्ह यांचे  विभागीय आयुक्त श्री. अर्दड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

 

सन 2022-23 जिल्हा परिषद लातूर यांना राज्यस्तरीय तृतीय क्रमांक रू.17 लक्ष, पंचायत समिती लातूर यांना राज्यस्तर प्रथम क्रमांक रू.20 लक्ष, पंचायत समिती लातूर यांना विभागस्तर प्रथम क्रमांक रू.11 लक्ष, पंचायत समिती जळकोट, जि.लातूर यांना विभागस्तर द्वितीय क्रमांक रू.8 लक्ष, पंचायत समिती, अर्धापूर जि.नांदेड यांना विभागस्तर तृतीय क्रमांक रू.6 लक्ष असे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त सुरेश बेदमुथा यांनी केले. डॉ. सीमा जगताप यांनी आभार मानले. विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

***** 






Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा