जिल्ह्यात पूरात अडकलेल्या 36 व्यक्तींची सुटका, मदत व बचावकार्यासाठी प्रशासन सज्ज
·         एन.डी.आर.एफ. चे पथक रात्री सव्वा एक वाजता दाखल
·         एन.डी.आर.एफ पथकाकडून 18 व्यक्तींची सुटका
·         नदीकाठच्या 1 हजार 265 नागरिकांचे स्थलांतरण
·         पूरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यु
·         चार ठिकाणी स्थलांतरीत नागरिकांसाठी शिबीरे

लातूर,दि.02: जिल्ह्यात दिनांक 01 ऑक्टोबर 2016 रोजी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 36 व्यक्ती अडकलेल्या होत्या. त्यामधून स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत 18 व्यक्तींची सुखरुप सुटका करण्यात आली होती. परंतु मावलगाव ता. अहमदपूर व सेलु जवळगा ता. रेणापूर येथील भीषण पूर परिस्थितीचा अंदाज घेऊन पुणे येथील एन.डी.आर.एफ. चे शोध व बचाव पथकास बोलाविण्यात आले. या पथकाने 18 व्यक्तींची सुटका केली आहे. तरि जिल्हा प्रशासन पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आपत्ती नियंत्रणासाठी सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिली आहे.
मावलगाव ता. अहमदपूर येथे पाण्याचा येवा अधिक आल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन गावांतील 10 लोक पूरात अडकले. प्रशासनाच्या बचाव पथकाने सर्व साहित्यासह बोट घेऊन 10 व्यक्तींची सुटका करण्याचा प्रयत्न केला. परंतु पाण्याचा फ्लो खूप अधिक असल्याने सदरील बोटीस अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचता येत नसल्याने पुणे येथील एन.डी.आर.एफ. च्या बचाव व शोध पथकास पाचारण करण्यात आले.  एन.डी.आर.एफ. चे पथक रात्री सव्वा एक वाजता जिल्ह्यात दाखल झाले व सकाळी 6.00 वाजता मावलगाव येथील पूरात अडकलेल्या 10 व्यक्तींची सुटका करण्यात आली, अशी माहिती प्रशासनाने दिलेली आहे.
सेलु जवळगा ता. रेणापूर येथील पूरात सात व्यक्ती अडकलेल्या होत्या. या सर्व व्यक्तीची सुटका एन.डी.आर.एफ. पथकाने पहाटे 4.00 वाजता केली. तसेच रेणा नदीवर अडकलेल्या एका व्यक्तीची सुटका ही या पथकाकडुन करण्यात आलेली असून सदरील पथकाने पूरात अडकलेल्या 18 व्यक्तींची सुखरुप सुटका केलेली आहे, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे.
जळकोट तालुक्यातील बेलसांगवी गावाला पूराचा वेढा पडल्याने गावांतील सुमारे 200 लोक अडकले होते. तरि प्रशासनाच्या शोध व बचाव पथकाने त्या सर्व लोकांना सुखरुप गावाबाहेर काढून लाळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत स्थलांतरित केले. त्याप्रमाणेच चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील पूरात अडकलेल्या पाच व्यक्तींची सुटका प्रशासनाने स्थानिक लोकांच्या मदतीने केली. तसेच प्रशासनाने रेणानदीवरील पुलावर अडकलेल्या तीन नागरिकांची सुटका स्थानिकंच्या मदतीने केलेली आहे.
एन.डी.आर.एफ. :- जिल्हयातील भीषण पूर परिस्थिचा अंदाज घेऊन जिल्हा प्रशासनाने पुणे येथील एन.डी.आर.एफ. च्या एका शोध व बचाव पथकास पाचारण केले. सदरचे पथक रात्री 1 वाजून 15 मिनिटांनी रेणापूर येथे पोहोचले. या पथकात 2 अधिका-यांसह 40 जवान होते. त्यातील 10 जवानाचा एक गट रेणापूर तालुक्यातील सेलु जवळगा येथील शोध व बचाव कार्यास गेला. तर दुसरा गट अहमदपूर तालुक्यातील मावलगाव येथे अडकलेल्या व्यक्तींच्या बचावासाठी गेला. एन.डी.आर.एफ. च्या पथकामुळे 18 लोकांची सुखरुप सुटका करण्यात आलेली आहे. सदरचे पथक हे पूर परिस्थितीमध्ये आवश्यक असलेल्या सर्व अद्यावत अशा साहित्यासह सुसज्ज असून लातूर जिल्ह्यात दाखल होताच तत्परतेने बचावाचे कार्य सुरु करुन 18 लोकांना सुखरुप सोडविले आहे.
इमर्जन्सी लाईटींग टॉवर :- मावलगाव ता. अहमदपूर व सेलू जवळगा ता. रेणापूर या दोन गावात पूरात अडकलेल्या व्यक्तींना सुखरुप सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यक्ती अडकलेल्या ठिकाणच्या परिसरात इमर्जन्सी लाईटींग टॉवर उभे केलेले होते. या टॉवरच्या लाईटींगचा प्रकाश 1 किलो मीटरच्या परिसरात पडला जाऊन बचावासाठी येणा-या एन.डी.आर.एफ. पथकाला त्यामुळे मदत मिळाली.
शिबीर :- पूरामूळे स्थलांतरित कराव्या लागलेल्या नागरिकांसाठी प्रशासनाच्या वतीने चार ठिकाणी शिबीरे लावण्यात आलेली आहेत. यात औसा तालुक्यातील तोंडाळी येथील शिबीरात 250 लोक राहत आहेत. तर रेणापूर तालुक्यात सेलू जवळगा गावाबाहेर (60 लोक), माकेगाव जि. प. शाळा (550 लोक) व भोकरंबा मंदीर (100 लोक) अशी तीन शिबीरे लावण्यात आलेली असून शिबीरात प्रशासनाच्या वतीने आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
एका व्यक्तीचा मृत्यु :- अहमदपूर तालुक्यातील सावरगाव थोट येथील बालाजी गोविंद पांचाळ हा 20 वर्षीय तरुण पूराच्या पाण्यात वाहून गेला. या तरुणाचा मृतदेह एन.डी.आर.एफ. चया शोध व बचाव पथकाने आज शोधून काढला.
बंद पडलेले रस्ते पुर्ववत :- काल पूरपरिस्थितीमुळे वाहतुकीस बंद करण्यात आलेला नांदेड-लातूर, खोराळा-रेणापूर, पाणगाव-रेणापूर, माटेगाव-रेणापूर, खलंग्री- रेणापूर हे सर्व रस्ते पूराचे पाणी ओसरल्याने वाहतुकीस पुर्ववत करण्यात आलेले आहेत.
बाधित तलाव :- अतिवृष्टी व पूरामुळे  कारेपूर वनविभागाचा तलाव, मंगरुळ ता. जळकोट येथील पाझर तलाव क्र-5, वाढवणा खु., मोरताळवाडी व किनी ये ता. उदगीर येथील प्रत्येकी 1 या प्रमाणे 3 व एकूण 5 पाझर तलाव बाधित झालेले आहेत.
आज सकाळी तावरजा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरु झाल्याने औसा तालुक्यातील अलमला गावांमधील 35 शेतकरी पुराच्या पाण्यात अडकले होते. परंतु प्रशासनाने तत्परतेने स्थानिक लोकांच्या मदतीने सर्व 35 शेतक-यांची सुखरुप सुटका केलेली आहे. या पूर परिस्थितीमध्ये प्रशासनाने नदीकाठावरील गावांमधील 1 हजार 265 नागरिकांना स्थलांतरित केलेले आहे.
समन्वय :- जिल्हाधिकारी पांडुरंग पोले याच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या माध्यमातून सर्व शासकीय विभागांशी योग्य समन्वय ठेवत असून पूर परिस्थितीचा अंदाज घेऊन प्रशासनाची सर्व यंत्रणा सज्ज आहे. तसेच पूराच्या पाण्याविषयी नदीकाठावरील सर्व गावांना व तेथील नागरिकांना वेळोवेळी माहिती दिली जात आहे. तसेच गर



जेनुसार बचाव कार्य ही केले जात आहे. या पूरपरिस्थितीमध्ये जिल्ह्याच्या सर्व तालुक्यास्तरीय यंत्रणा सतर्क असून पूरात अडकलेल्या लोकांना वेळीच मदत पोहोचविली जात आहे.
नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा :- मांजरा व तावरजा धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

****



Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु