प्रत्येक नुकसानग्रस्त शेतक-याला पिक विम्याचा लाभ मिळाला पाहीजे
                                   -         कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत
         लातूर,दि. 10: जिल्ह्यात अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. तरि महसूल व कृषि विभागाने प्रत्येक नुकसानग्रस्त शेतक-याला पिक विम्याचा लाभ मिळाला पाहीजे याकरिता परस्परांत समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश कृषि व फलोत्पादन, पणन राज्यमंत्री श्री. सदाभाऊ खोत यांनी दिले.
             शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित शेती पिकांच्या नुकसानीबाबतच्या आढावा बैठकीत कृषि राज्यमंत्री श्री. खोत बोलत होते. यावेळी खासदार सुनील गायकवाड, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, निवासी उपजिल्हाधिकारी नारायण उबाळे, माजी आमदार पाशा पटेल, कृषि सहसंचालक अशोक किरनाळ्ळी, कृषि उपसंचालक श्री. सरोदे, प्र. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजय  पाटील, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. मोरे यांच्यासह कृषि विभाग व विमा कंपन्यांचे इतर अधिकारी उपस्थित होते.
             कृषि राज्यमंत्री खोत म्हणाले की, महसूल व कृषि विभागामार्फत पिक नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. तर विमा कंपन्यांनी पिक नुकसानीचे अहवाल वस्तुनिष्ठ पध्दतीने द्यावेत. विमा कंपन्यांच्या चुकीच्या अहवालामुळे एक ही नुकसानग्रस्त शेतकरी पंतप्रधान पिक विमा  योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, असे श्री. खोत यांनी स्पष्ट केले. तसेच लातूर जिल्ह्यासह लातूर कृषि विभागात सर्वत्र अतिवृष्टी झालेली असून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे सांगून श्री. खोत म्हणाले की, जास्तीत जास्त नुकसानग्रस्त शेतक-यांना पिक विम्याचा लाभ मिळण्यासाठी सर्व यंत्रणांनी बिनचूक पिक नुकसानीचे अहवाल वेळेत सादर करावेत.
            तसेच पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभागी न झालेल्या शेतक-यांच्या पिकांचे पंचनामे करुन त्या शेतक-यांना एन.डी.आर.एफ. निधीअंतर्गत मदत मिळण्यासाठी अहवाल लवकर पाठविण्याची सूचना कृषि राज्यमंत्री खोत यांनी केली. त्याप्रमाणेच नदी, नाले व बंधा-यांच्या बाजूंची पिके वाहून गेलेली आहेत त्या पिकांचे ही पंचनामे करुन त्या शेतक-यांना मदत मिळेल यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
            अतिवृष्टीने पिकांबरोबरच शेतीचे व घरांचे ही नुकसान झालेले असून त्या नुकसानीचे ही वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश श्री. खोत यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. तसेच ग्रामीण भागातील रस्ते, सिमेंट नाला बांध वाहून जाणे व त्यामुळे शेतीचे झालेले नुकसान याचा ही सविस्तर अहवाल देण्याचे त्यांनी सांगीतले.
       पंतप्रधान पिक विमा योजनेत भरपाई देणा-या विमा कंपन्यांनी महसूल व कृषि विभागाचे पिक नुकसानीचे अहवाल प्रमाणीत मानून त्याप्रमाणे आपले नुकसानीचे अहवाल विमा कंपनीच्या मुख्यालयाला सादर करावेत, असे श्री. खोत यांनी स्पष्ट केले.
         पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत शेतक-यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी महसूल व कृषि विभागांतील अधिका-यांना काही अडचणी असतील तर त्या सर्व अडचणीचा अहवाल  दोन दिवसात मंत्रालयात पाठवा त्यानुसार कृषि अधिकारी व विमा कंपन्यांचे अधिकारी यांची पुढील आठवड्यात मंत्रालयात बैठक घेऊन त्याबाबत निर्णय घेता येईल, असे श्री. खोत यांनी सांगीतले.
               जिल्हाधिकारी पांडुरंग पोले म्हणाले की, प्रशासनामार्फत अतिवृष्टीने झालेल्या पिक नुकसानीचे पंचनामे वस्तुनिष्ठ केले जात असून विमा कंपन्यांनी महसूल व कृषि विभागाचे हे पंचनामे प्रमाणीत मानावेत.  यावेळी खासदार सुनील गायकवाड व माजी आमदार पाशा पटेल यांनीही पिक नुकसानीबाबत व पंचनामेबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या.
                प्रारंभी कृषि सहसंचालक अशोक किरनाळ्ळी यांनी लातूर विभागांतर्गत येणा-या सर्व जिल्ह्यांची संक्षिप्त माहिती दिली. तर प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी लातूर जिल्ह्याचे पर्जन्यमान, पेरणी क्षेत्र, अतिवृष्टीने बाधीत गावे,पंतप्रधान पिक विमा योजनेत पिक विमा भरलेले शेतक-यांची संख्या, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानांची पिक निहाय माहिती प्रस्ताविकात सांगितली, तर उपविभागीय कृषिअधिकारी आर. टी. मोरे यांनी शेवटी आभार मानले.
*****


Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु