‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ कार्यक्रम समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यत पोहोचला पाहीजे
-         जिल्ह्याधिकारी पांडुरंग पोले
         लातूर,दि.14: सन 2001 च्या लोकसंख्येनुसार लातूर जिल्ह्यात 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुला-मुलींचे प्रमाण 918 इतके होते. परंतु 2011 च्या लोकसंख्येनुसार हे प्रमाण कमी होऊन 889 पर्यंत आलेले आहे. तरि लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मुला-मुलींच्या प्रमाणात वाढ होण्यासाठी शासनाने दिलेला बेटी बचाओ बेटी  पढाओ कार्यक्रम समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवून समाज प्रबोधन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी केले.
              जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय टास्क फोर्सच्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. पोले मार्गदर्शन करत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म.व बा.) श्री. केकान, पोलीस उपअधिक्षक (गृह) रमेश कंतेवार, शिक्षणाधिकारी (मा.) गणपत मोरे, महिला व बालविकास अधिकारी बी. एच. निपाणीकर याच्यासह इतर समिती सदस्य उपस्थित होते.
                जिल्हाधिकारी श्री. पोले म्हणाले की, बेटी बचाओ बेटी पढाओ हा कार्यक्रम जिल्हा, तालुका व ग्रामीण पातळीवरील समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजन आराखडा पुढील आठ दिवसात तयार करावा व या आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली.
                जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात ब्लॉक टास्क फोर्सच्या बैठकांचे दोन टप्यात आयोजन करावे. पहिल्या टप्यात पंचायत समिती सभापती, पदाधिकारी, सरपंच तर दुस-या टप्यात तालुका प्रशासन, तलाठी, ग्रामसेवक अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेवीका यांना बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमाची सविस्तर माहिती द्यावी, अशी सुचना श्री. पोले यांनी केली. तसेच जिल्हास्तरावरील टास्क फोर्स समिती मधील सर्व समिती सदस्यांनी आपल्या विभागांची बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमांबाबत कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करण्यांचे निर्देश श्री. पोले यांनी दिले. प्रत्येक विभाग या कार्यक्रमात कशा पध्दतीने कामकाज  करणार आहे याची माहिती त्वरित महिला व बाल विकास विभागाला सादर करावी असे त्यांनी सांगितले.
               तसेच प्रशासकीय, शेती, क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय, स्वयंसेवी संस्था, पत्रकारिता, सामाजिक, धार्मीक, शैक्षणिक आदि क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणा-या जिल्ह्यातील प्रत्येक पाच महिला / मुलींची आयकॉन म्हणून महिला व बालविकास विभागाने निवड करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी श्री. पोले यांनी केली.
               जिल्ह्याच्या प्रत्येक तालुका व ग्रामपातळी पर्यंतच्या लोकांपर्यंत बेटी बचाओ, बेटी पढाओ कार्यक्रमांतर्गत स्त्रीभृण हत्या रोखून मुलींच्या प्रमाणात वाढ करण्याबरोबरच सर्व मुलींना दर्जात्तम शिक्षण मिळेल याकरिता सर्व संबंधित विभागाने परस्परांत समन्वय ठेवून काम करावे, असे श्री. पोले यांनी सांगितले.
            प्रारंभी या टास्कफोर्सचे सदस्य सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. केकान यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ हा कार्यक्रम केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दिनांक 21 फेब्रुवारी 2016 पासून मुलींचा जन्मदर कमी असलेल्या देशातील 100 जिल्ह्यात सुरु असल्याचे सांगितले. या टास्क फोर्सचा उद्देश जिल्ह्यात पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करुन मुलींचे लिंगगुणोत्तर प्रमाण वाढविण्यासाठी उपाय योजना करणे हा असल्याची माहिती त्यांनी दिली.
            तसेच लातूर जिल्ह्यात 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुला-मुलींचे प्रमाण सन 1991 मध्ये 947 , सन 2001 मध्ये 918 व सन 2011 मध्ये 889 असल्याची माहिती श्री. केकान यांनी दिली. तर सन 2001 च्या तुलनेत जिल्ह्यातील सर्व 10 तालुक्याच्या प्रमाणात घट झाली असून रेणापूर तालुक्यामध्ये 88 अंकांची घट झालेली आहे. तर महाराष्ट्र राज्यात सन 2011 च्या लोकसंख्येनुसार मुला-मुलींचे प्रमाण 894 इतके आहे, असे त्यांनी बैठकीत सांगीतले.
*****





Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु