अल्पसंख्यांक समाजाच्या
सर्वांगीण विकासासाठी प्रशासन कटीबध्द
-जिल्हाधिकारी
पांडुरंग पोले
लातूर,दि.18: केंद्र व राज्य शासनामार्फत अल्पसंख्यांक समाजाच्या
सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात आहेत. या सर्व योजनांची
जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणी करुन अल्पसंख्यांकांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी
प्रशासन कटीबध्द असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित
आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्तच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी पांडुरंग
पोले बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अक्षीक्षक लता फड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे
प्रकल्प संचालक श्री. पाटील, शिक्षणाधिकारी (मा) गणपत मोरे, शिक्षणाधिकारी (प्रा.)
शेख नजरोद्दीन इस्माईल, सहाय्यक नियोजन अधिकारी श्री. राजुरवार, जैन संघटनेचे अभय शहा,
आझाद युवा संघटनेचे बरकत काझी, ॲड. सय्यद शफी,महोमद्दिन अली सहाब,रजाऊलाखान, ॲड. रब्बानी
बागवान, पोलीस उपअधीक्षक (गृह) डी. डी. शिंदे यांच्यासह संबंधित विभाग प्रमुख व अल्पसंख्यांक
समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पोले म्हणाले की, अल्पसंख्यांक समाजातील
सर्व जाती घटकांचा इतर समाजाच्या बरोबरीने समान पातळीवर विकास होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील
आहे. त्याकरिता सर्व संबंधित शासकीय विभागांनी अल्पसंख्यांकासाठी राबविण्यात येत असलेल्या
योजना अधिक गतीमान पध्दतीने राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
शासनाने सर्व बँकांनी केलेल्या कर्जपुरवठ्यात
अल्पसंख्यांक समाजातील घटकांना कशा पध्दतीने कर्जपुरवठा करुन त्यांची आर्थीक उन्नती
होण्यासाठी हातभार लावला आहे याबाबतची माहिती घेण्याची सुचना केली असून त्याप्रमाणे
बँकांना प्रशासनाने निर्देश दिलेले आहेत, असे श्री. पोले यांनी सांगितले.
लातूर शहरात अल्पसंख्यांक समाजातील मुलींसाठी
असलेल्या वसतिगृहा करिता डिसेंबर 2016 अखेर पर्यंत उर्वरित निधी प्राप्त होणार असून
मुलांच्या वसतिगृहासाठी मागणी केलेल्या खोरे गल्लीतील जागेचा आरक्षण काढण्याबाबतचा
प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला आहे, असे श्री. पोले यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण
विभागाने अल्पसंख्यांच्या योजनांची माहिती व त्याबाबतची कार्यवाही करण्यासाठी प्रत्येक
ठिकाणी स्वतंत्र्य कर्मचा-यांची नियुक्ती करण्याचे निर्देश श्री. पोले यांनी दिले.
तसेच जिल्ह्यातील वक्फ बोर्ड अंतर्गतच्या मालमत्ता बाबत मे 2015 च्या शासन निर्णयानुसार
कार्यवाही सुरु असल्याचे सांगून जैन समाजाला अल्पसंख्यांक असल्याचे प्रमाणपत्र देण्याचा
विषय मार्गी लावण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले
व अल्पसंख्यांक समाजातील मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक
हक्क दिनाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
सहाय्यक नियोजन अधिकारी राजुरवार यांनी
अल्पसंख्यांक हक्क दिनाचा उद्देश सांगून संयुक्त राष्ट्राने 18 डिसेंबर 1992 रोजी राष्ट्रीय
वंचित, धार्मीक आणि भाषीक अल्पसंख्यांकांच्या हक्काचा जाहीरनामा स्विकृत करुन प्रस्तुत
केला व त्यामुळे प्रतिवर्षी संपुर्ण जगात 18 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक
हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो, असे सांगितले. तसेच अल्पसंख्यांक समाजात मुस्लीम,ख्रिश्चन,शीख,
बौध्द,जैन, पारसी व ज्यु समाजाचा समावेश होत असल्याचे सांगुन लातूर जिल्हा प्रशासनाच्या
वतीने या
समाजासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची सविस्तर माहिती श्री. राजुरवार यांनी दिली.
यावेळी अल्पसंख्यांक समाजातील मान्यवरांनी
विविध शासकीय योजनांचा लाभ वंचित घटकांपर्यंत पोहचविणे व त्यासाठीच्या आवश्यक निधी
मिळविणे याबाबत अधिक गतीने कार्यवाही करण्याची मागणी आपल्या मनोगतामध्ये केली.
*****
Comments
Post a Comment