व्यापारी व सेवा पुरवठादारांच्या सेवेत कमतरता
असल्यास
ग्राहकांनी तक्रारी नोंदवाव्यात
-जिल्हाधिकारी पांडुरंग पोले
लातूर,दि.26: प्रत्येक व्यक्ती हा
ग्राहक व विक्रेता असतो. ग्राहक म्हणून व्यक्तीने आपल्या हक्कासाठी झगडलेच पाहिजे.
तसेच व्यापारी व सेवा पुरवठादारांच्या सेवाबाबत
कमतरता असल्यास ग्राहकांनी त्याबाबतच्या तक्रारी तात्काळ नोंदविण्याची दक्षता घ्यावी,
असे आवाहन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी केले.
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त
टाऊन हॉल ग्रंथालय येथे आयोजित चर्चासत्र व
शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी पोले बोलत
होते. यावेळी माहापालिका आयुक्त रमेश पवार,
अतिरिक्त पोलीस अधिक्षक लता फड, जिल्हा पुरवठा अधिकारी शोभा जाधव, अखिल भारतीय ग्राहक
पंचायत लातूर जिल्हा अध्यक्ष ॲड. महेश ढवळे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष
प्रदीप निटुरकर, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे सदस्य अजय भोसरेकर, तहसिलदार संजय
वारकड यांच्यासह विद्यार्थी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पोले पुढे म्हणाले
की, ग्राहकांनी शिथिलता झटकून टाकुन ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती घ्यावी व त्याप्रमाणे
सेवा प्राप्त होत नसतील तर संबंधितांच्या तक्रारी ग्राहक मंचाकडे द्याव्यात. तसेच व्यापारी
व सेवा पुरवठादार संस्थानी कार्यक्षमपणे वस्तू व सेवांचा पुरवठा ग्राहकांना केला पाहिजे,असे
त्यांनी सांगितले.
स्थानिक
स्वराज्य संस्था ग्राहकांना दैनंदिन विविध सेवा उपलब्ध करून देतात, तर सर्व संस्थानी
नागरिकांना गतीमानतेने सेवांचा पुरवठा केला
पाहीजे, असे श्री. पोले यांनी सांगितले. तसेच विविध शासकीय यंत्रणानी त्यांच्या मार्फत
राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती प्रदर्शनात दिली जात असून याव्दारे
ग्राहकांनी आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढवून शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी
केले.
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त
आयोजित चित्रकला, रांगोळी, वर्क्तृत्व व निबंध स्पर्धेच्या माध्यामातून जास्तीत जास्त्
विद्यार्थ्यांपर्यंत ग्राहक संरक्षण कायदयाची माहिती पोहचली तर प्रदर्शनाच्या माध्यमातून
अनेक ग्राहकांना ही लाभ होणार असल्याने आजच्या कार्यक्रमाचा उद्देश सफल झाला असल्याचे
श्री. पोले यांनी सांगितले.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण
मंचाचे सदस्य श्री. भोसरेकर यांनी राष्ट्रीय ग्राहक संरक्षण कायद्याची उपस्थितांना
सविस्तर माहिती देऊन प्रत्येकाने या कायद्याबाबत माहिती घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही
करण्याचे आवाहन केले. तर ग्राहक पंचायतचे अध्यक्ष श्री. भराडीया यांनी ‘जय ग्राहक शक्ती’…
हे गीत गायले व ग्राहकांनी वस्तु अथवा सेवा खरेदी करतांना बिल घेतले पाहीजे, असे सांगुन
वस्तु खराब असेल तर संबंधित यंत्रणांना त्वरित कळवून पुढील कार्यवाही करण्याचे आवाहन
त्यांनी केले. अप्पर पोलीस अधीक्षक लता फड व ॲड. महेश ढवळे यांची ही मार्गदर्शनपर भाषणे
झाली.
प्रारंभी टाऊन हॉल ग्रंथालयाच्या
मैदानात विविध शासकीय यंत्रणेने उभारलेल्या माहितीपर स्टॉल प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी
पांडुरंग पोले व मान्यवरांच्या हस्ते झाले. तर सभागृहात विवेकानंद यांच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण करुन व दीपप्रज्वलन करुन राष्ट्रीय ग्राहकदिनानिमित्तच्या कार्यक्रमाचे
उद्घाटन करण्यात आले.
प्रारंभी तहसिलदार संजय वारकड
यांनी प्रास्ताविकात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचा उद्देश सांगितला.
तर प्रतिवर्षी दिनांक 24 डिसेंबर 2016 रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो,
परंतु यावर्षी 24 डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी आल्याने आज दिनांक 26 डिसेंबर रोजी
हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रदर्शनात उपप्रादेशिक परिवहन
कार्यालय, आरोग्य विभाग,कृषि विभाग, अन्न व औषध प्रशासन, जिल्हा माहिती कार्यालय,जिल्हा
परिषदेचे विविध विभाग, वैध मापनशास्त्र यंत्रणा, स्टेट बँक ऑफ हैद्राबाद, महाबीज आदि
कार्यालयांनी स्टॉल मांडुन ग्राहकांना माहिती देत असल्याचे त्यांनी सांगितले. तर नागरी
पुरवठा तपासणी अधिकारी सुरेश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त
दिनांक 24 व 25 डिसेंबर 2016 रोजी 20 शाळा व महाविद्यालयाच्या 426 विद्यार्थांनी चित्रकला,वर्क्तत्व,निबंध
व रांगोळी स्पर्धेत सहभाग घेवुन ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती जाणून घेतली यातील
26 विद्यार्थांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
तसेच स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात सहभागी झालेल्या सर्व शिक्षक, प्राध्यापकांना ही प्रमाणपत्र
देऊन गौरविण्यात आले.
लोकराज्य
स्टॉलला भेट :-
येथील टाऊन हॉलच्या मैदानात
आयोजीत विविध शासकीय यंत्रणेच्या योजनाबाबतच्या माहितीपर स्टॉलचे उद्घाटन जिल्हाधिकारी
पांडुरंग पोले, महापालिका आयुक्त रमेश पवार व जिल्हा तक्रारण निवारण मंचचे अध्यक्ष
प्रदीप निटूरकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी जिल्हाधिकारी पोले यांनी
जिल्हा माहिती कार्यालयामार्फत लोकराज्य मासिकाच्या स्टॉलला भेट देऊन तेथील लोकराज्य
अंकाची पाहणी केली. यावेळी माहिती कार्यालयाच्या वतीने श्री. पोले यांना डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या जीवनावरील ऑक्टोबर 2006 चा विशेषांक व चालू महिन्याचा अंक भेट म्हणून
देण्यात आला.
*****
Comments
Post a Comment