नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यास
उपस्थित राहावे
                                        -पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर


        लातूर,दि.19:मुंबईजवळ अरबी समुद्रात उभारण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे जलपूजन व भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 डिसेंबर 2016 ला होत आहे. या भूमिपूजन सोहळ्यासाठी लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याचे आवाहन कौशल्य विकास, कामगार कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केले. यावेळी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, अतिरिक्त पोलीस अधीक्षक लता फड, नियोजन अधिकारी एस. बी. कोलगणे, तहसीलदार संजय वारकड आदि उपस्थित होते.
                पालकमंत्री निलंगेकर पुढे म्हणाले की, राजभवनापासून जवळच असणा-या समुद्रातील 15.96 हेक्टर बेटावर जगातील सर्वात उंच असे हे स्मारक असेल. हा कार्यक्रम अधिक संस्मरणीय ठरावा यासाठी राज्यातील  सुमारे 70 हून अधिक प्रमुख नद्यांचे जल आणि गड किल्ल्यांवरची पवित्र माती या ठिकाणी आणली जाणार आहे. तसेच राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबई लगत अरबी समुद्रात उभारण्याचा निर्णय 2002 मध्ये घेतला. परंतु मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने याबाबत कार्यवाही पूर्ण करुन स्मारकाच्या कामास गती दिली. अरबी समुद्रातील जागा निश्चित करुन त्या जागेवर स्मारक उभारणीस 28 फेब्रुवारी  2014 ला मान्यता मिळाली असल्याचे श्री. निलंगेकर यांनी सांगितले.
           या स्मारकास राज्य व केंद्र शासनासह महापालिकेच्या विविध विभागाच्या परवानग्या आवश्यक होत्या. यामध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, नौदल पश्चिम विभाग, तटरक्षक दल, सागरी किनारा अधिनियम, मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालीका, बेस्ट,मुंबई पोर्ट ट्रस्ट, बी.एन.एच.एस. इंडिया, मत्सव्यवसाय विभाग,राष्ट्रीय सुरक्षा दल,दिल्ली, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण अशा बारा विभागांची ना हरकत प्रमाणपत्रे शासनास प्राप्त झाली आहेत,असे माहिती श्री. निलंगेकर यांनी दिली.
         आपल्या असामान्य कामगिरीने महाराष्ट्राची पताका जगभरात फडकवणा-या छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राच्या वतीने हे अनोखे वंदन असेल. महाराष्ट्राची तेजस्वी आणि गौरवशाली इतिहासाचे प्रतिबिंब या स्मारकाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचे अनोखे व विशिष्ट स्वरुप लक्षात घेवून प्रकल्पाचा आराखडा, निविदा कागदपत्रे तयार करणे, प्रकल्पावर देखरेख करणे, यासाठी दिनांक 11 एप्रिल 2016 रोजी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणुक करुन त्यानंतर प्रकल्प आराखडा मंजुर करण्यात आला आहे,असे श्री. निलंगेकर यांनी सांगितले.
या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 2300 कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा, महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित कला दालन, प्रदर्शन गॅलरी, महाराजांच्या चरित्रावर आधारित पुस्तकाचे सुसज्ज वाचनालय, प्रेक्षक गॅलरी, उद्यान, हेलीपॅड, अतिमहत्वाच्या व्यक्तीसाठी व जनतेसाठी जेट्टी (धक्का), सुरक्षा विषयक व्यवस्था, आदि बाबींचा समावेश आहे. येत्या 3 वर्षात स्मारक पुर्ण करण्याचे सरकारचे नियोजन असून ते भावी पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. महाराजांचे जीवनमुल्य प्रदर्शित करणारे देशभक्तीपर माहिती केंद्रही या स्मारकात असेल. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी पर्यटनस्थळ असणार आहे, असे श्री. निलंगेकर यांनी स्पष्ट केले.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु