लातूर धर्मादाय सहआयुक्त कार्यालयामार्फत एका वर्षात 4 हजार 200 न्यायीक प्रकरणांचा निपटारा
लातूर धर्मादाय सहआयुक्त कार्यालयामार्फत
एका वर्षात 4 हजार 200 न्यायीक प्रकरणांचा निपटारा
लातूर,दि.21: धर्मादाय सह आयुक्त तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, लातूर या कार्यालयाने सन २०२४ या वर्षामध्ये धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या निर्देशानुसार वेळोवेळी विशेष मोहिमा राबवून लातूर जिल्ह्यातील विविध सार्वजनिक न्यासाचे बदल अर्ज, नवीन न्यास नोंदणीची प्रकरणे व महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० च्या विविध कलमान्वये दाखल प्रकरणांचा निपटारा करुन सन २०२४ मध्ये एकूण ४ हजार २०० न्यायीक प्रकरणे निकाली काढली आहेत. त्याच प्रमाणे अशा प्रकरणांच्या निकालांच्या प्रती संकेतस्थळावर उपलब्ध केल्या आहेत.
नवीन संस्था नोंदणी व न्याय नोंदणीची प्रकरणे संकेतस्थळावर ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा उपलब्ध केली असल्याने नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नोंदणी प्रमाणपत्रे डिजीटल स्वाक्षरीने उपलब्ध करण्याची सोय उपलब्ध केली आहे.
विश्वस्त संस्थांना दाखल करावे लागणारे लेखा परिक्षण अहवाल संकेतस्थळावर ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे संस्था व न्यास नोंदणीकरिता, तसेच लेखा परिक्षण अहवाल दाखल करण्याकरिता पक्षकारांना कार्यालयात येण्याची आवश्यकता भासत नाही.
सन २०२४ मध्ये धर्मादाय आयुक्त तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाने १८९ नवीन संस्था नोंदणीची प्रकरणे निकाली काढली आहेत. न्यास नोंदणी प्रक्रियेत, तसेच बदल अर्जाच्या न्यायीक प्रक्रियेत निकालाकरिता होणारा विलंब टाळण्याकरिता प्रकरणे दाखल करण्याच्या टप्यावर त्यांची तपासणी करुन त्यातील त्रुटी दूर करुन अशी प्रकरणे लवकरात लवकर निकाली करण्याची कार्यवाही केली जात आहे. अवादातीत बदल अर्जाकरिता विशेष मोहिम राबवून अशी प्रकरणे जास्तीत जास्त संख्येने निकाली केली जात आहेत. संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या नोंदणी प्रक्रियेचा व निकाली प्रकरणांच्या आदेश उपलब्ध केलेल्या सुविधेचा पक्षकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन धर्मादाय उप आयुक्त एस.व्ही.एच. कादरी लातूर यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment