“भारतीय सांकेतिक भाषेतून शिकविणार कर्णबधिर शाळेतील विशेष शिक्षक ”

 

भारतीय सांकेतिक भाषेतून शिकविणार कर्णबधिर शाळेतील विशेष शिक्षक

लातूर,दि.27,(जिमाका):- समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त कार्यालयातंर्गत हिंगोली, लातूर, नांदेड, व धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये एकूण 47 कर्णबधिर प्रवर्गाच्या विशेष शाळा आहेत. या सर्व विशेष शाळांमधून कर्णबधिर विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याकरिता विशेष शिक्षकांना सांकेतिक भाषेचा वापर करावा लागतो. परंतू प्रत्येक शाळेमध्ये वेगवेगळ्या पध्दतीची सांकेतिक भाषा वापरली जात असल्याचे समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या निर्दशनास आले. त्यामुळे सर्व शाळांमध्ये सांकेतीक भाषेची एकवाक्यता व समानता यावी दृष्टीकोनातून अलियावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्था मुंबई यांच्या सहकार्याने दिनांक 26 मार्च ते 28 मार्च 2025 या कालावधीत तीन दिवशीय भारतीय सांकेतीक भाषेचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत.

यासाठी प्रत्येक शाळेतील एका विशेष शिक्षकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण घेतलेले विशेष शिक्षक आपल्या शाळेतील इतर शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षण वर्गात विभागातील 50 विशेष शिक्षकांनी सहभाग नोंदविला असून यातील मास्टर ट्रेनर आपल्या विद्यालयातील इतर विशेष शिक्षकांना या सांकेतीक भाषेचे प्रशिक्षण देणार आहेत. यामुळे दिव्यांगाच्या कर्णबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना सांकेतिक भाषेची समानता शिकायला मिळणार आहे.

या प्रशिक्षण वर्गासाठी अलियावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्था मुंबई या संस्थेतील विश्वास पाटील, अशिष सोनकर व जयेश सुरेजा हे तज्ज्ञ प्रशिक्षक प्रशिक्षण देत आहेत. या तीन दिवशीय प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, वैद्यकिय सामाजिक कार्यकर्ता राजू गायकवाड,  सहाय्यक सल्लागार बाळासाहेब वाकडे व शासकीय अंध शाळा अधीक्षक विजयकुमार जाधव हे उपस्थित होते.

*** 


Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन