डाक विभागातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त

विशेष आर्थिक सक्षमीकरण मोहीम

लातूर,दि.5: आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून, धाराशिव डाक विभागाच्या वतीने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विशेष अभियान राबविले जात आहे. हे अभियान धाराशिव मुख्य डाकघर  व त्याअंतर्गत येणारे २८ उप डाकघर आणि २५४ शाखा डाकघर तसेच  लातूर मुख्य डाकघर व त्याअंतर्गत येणारे ३० उप डाकघर आणि २६१ शाखा डाकघर येथे ८ मार्च २०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहे.

या विशेष अभियानाचा उद्देश महिलांना सुरक्षित आणि सरकारमान्य लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करणे आहे. महिलांना आर्थिक स्थैर्य मिळावे, त्यांच्या बचतीला योग्य दिशा मिळावी आणि मुख्यमंत्री माझी त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळावे या उद्देशाने डाक विभाग विविध योजनांद्वारे सहकार्य करत आहे. या उपक्रमांतर्गत महिलांसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, सुकन्या समृद्धी योजना, तसेच महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजना आणि लाडकी बहीण योजनाचा लाभ घेण्यासाठी बचत खात्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनांच्या माध्यमातून महिलांना आकर्षक व्याजदरासह सुरक्षित बचतीचा लाभ मिळू शकेल. या विशेष अभियानात खालील विविध लहान बचत योजना आणि सेवा उपलब्ध असतील.

आवर्ती ठेव योजना (आरडी): निश्चित मुदतीसाठी दरमहा ठराविक रक्कम जमा करण्याची योजना. सुकन्या समृद्धी योजना : मुलींसाठी विशेष बचत योजना, जिचा लाभ भविष्यातील शिक्षण व विवाहासाठी होतो. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र : महिलांसाठी अल्पकालीन आणि सुरक्षित गुंतवणूक योजना. मासिक उत्पन्न योजना : नियमित मासिक उत्पन्न मिळवण्यासाठी सुरक्षित गुंतवणूक. सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ): करसवलतीसह दीर्घकालीन बचत योजना. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र : निश्चित मुदतीसाठी सुरक्षित गुंतवणूक. किसान विकास पत्र : ठराविक कालावधीमध्ये रक्कम दुप्पट होण्याची योजना. आधार कार्ड अद्ययावत सेवा: आधार कार्डमध्ये आवश्यक बदल करण्याची सुविधा.

या विशेष मोहीम डाकघर, धाराशिव विभागाचे अधीक्षक एस. एन. अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे.

                                                   या विशेष मोहिमेचे फायदे

महिलांना आणि मुलींना आर्थिक स्थैर्य व भविष्याची तरतूद. सुरक्षित गुंतवणुकीच्या माध्यमातून स्थिर व आकर्षक व्याजदराचा लाभ . सरकारी हमी असलेली बचत योजना . महिला आणि कन्यांसाठी विशेष योजना . एका दिवसात खाते उघडण्याची आणि पासबुक मिळण्याची सुविधा

सर्व महिलांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा आणि आपल्या बचतीची गुंतवणूक भारत सरकारच्या डाक विभागाच्या सुरक्षित व विश्वासार्ह सेवांमध्ये करावी. खाते उघडण्यासाठी, ८ मार्च, २०२५ रोजी सकाळी ९ वाजता आवश्यक कागदपत्रांसह धाराशिव विभागातील कोणत्याही डाक घरास (मुख्य डाकघर, उप डाकघर, शाखा डाकघर)  भेट द्यावी व डाक विभागाच्या विविध सेवांचा लाभ घ्यावा.

****

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन