अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी पशुधन अभियान 2022-23 वैरणीसाठी, शेवगा लागवडीसाठी अर्थ सहाय्य 27 जून पर्यंत अर्ज सादर करावेत

 

                                                               

अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी पशुधन अभियान 2022-23

वैरणीसाठी, शेवगा लागवडीसाठी अर्थ सहाय्य 27 जून

पर्यंत अर्ज सादर करावेत

 

       *लातूर,दि.13 (जिमाका):-* केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैरणीसाठी शेवगा लागवड करणे (अनुसूचित जाती उपयोजना) या योजनेकरिता प्रति हेक्टर रुपये 30 हजार प्रती लाभार्थी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

       या योजने अंतर्गत अनुसुचित जाती प्रवर्गातील शेतकरी/पशुपालकांना वैरणीकरिता शेवगा लागवड करण्यासाठी अनुदान  वितरीत करण्यात येणार आहे प्रति हेक्टर 7.5 किलो शेवगा ( पीकेएम) बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे.

       बियाणांची किंमत रुपये 6 हजार 750 व उर्वरित अनुदान 23 हजार 250 असे एकुण रु 30 हजार असून  उर्वरित अनुदान रुपये 23 हजार 250 दोन टप्प्यामध्ये  वितरीत करण्यात येणार आहे. बियाणाचा थेट पशुपालकांना पुरवठा करण्यात येणार असून उर्वरित अनुदानातून जमिनीची मशागत, लागवड, खतांची खरेदी व इतर अनुषंगिक खर्च करावयाचा आहे.

      या योजनेकरिता इच्छुक असणा-या  अनुसुचित जाती प्रवर्गातील पशुपालक/ शेतकरी यांनी  दि. 10 जून 2022 पासुन  दि -27 जून 2022 पर्यत अर्ज सादर करावेत. सदरील अर्ज संबधीत तालुक्याच्या  पशुधन विकास अधकिारी  (विस्तार ) पंचायत  समिती आणि नजीकच्या  पशुवैद्यकीय दवाखाना यांच्याकडे उपलब्ध आहेत, तरी सदर अर्ज भरुन त्यांच्याकडे  सादर करावा. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, लातुर यांनी केले आहे.

           अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत. अर्ज, 7-12 आणि 8 अ नमुना(शेतीचा),  विहीर -बोअर असल्याचे लाभार्थीचे  पत्र,  बॅक खाते तपशील, राशन कॉर्ड, जनावरे किती व कोणकोणते  यांचे संबधीत डॉक्टरचे  प्रमाणपत्र, अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.

Comments