लातूर जिल्ह्यातील पाणी टंचाई उपाययोजनांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा पिण्याचे पाणी आणि चाराविषयक नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे - पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

लातूर जिल्ह्यातील पाणी टंचाई उपाययोजनांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा पिण्याचे पाणी आणि चाराविषयक नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे - पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले * पाण्याचा अवैध उपसा रोखून उपलब्ध पाण्याच्या वापराचे सूक्ष्म नियोजन करा * लातूर शहरासह ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याचे गावनिहाय नियोजन गरजेचे लातूर, दि. ०२: जिल्ह्यात यावर्षी वार्षिक सरासरीच्या केवळ ५४ टक्केच पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पांमध्ये अतिशय कमी पाणीसाठा शिल्लक आहे. हा जलसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला असून, पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने व प्रभावीपणे काम करावे, अशा सक्त सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या. तसेच, उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन पाणीपुरवठ्याचे गावनिहाय नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. पालकमंत्री श्री. भोसले यांनी आज लातूर जिल्ह्यातील पाणी व चाराविषयक स्थितीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठे व चाऱ्याच्या उपलब्धतेबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच, टंचाईविषयक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर 'वॉर रूम' स्थापन करून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून टंचाई उपाययोजनांना मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या पिण्याचे पाणी आणि पशुधनासाठी चारा उपलब्धतेच्या उपाययोजनांना सर्व संबंधित विभागांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे. लातूर शहर महानगरपालिकेसह ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याचे गावनिहाय नियोजन करावे. यामध्ये सद्यस्थितीत उपलब्ध जलस्रोतांद्वारे किती दिवस पाणीपुरवठा होऊ शकेल, त्यानंतरच्या काळात पाणीपुरवठ्यासाठी पर्यायी जलस्रोत कोणते आहेत आणि तिथून पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कोणत्या असतील, यांचा समावेश असावा. लातूर शहरात महानगरपालिका प्रशासनाने आणि ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने हा आराखडा तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री श्री. भोसले यांनी दिले. राज्य शासनाने जाहीर केलेल्या सवलतींची अंमलबजावणी; पंचनाम्यांची कार्यवाही गतीने करावी लातूर जिल्ह्यातील सर्व दहा तालुक्यांमध्ये राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून १२ सवलती लागू केल्या आहेत, तसेच पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, सर्व सवलतींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासह पिकांच्या पंचनाम्याला गती द्यावी. सध्या पीक कापणी प्रयोगातून उत्पन्नात मोठी घट दिसून येत असल्याने, पंचनामे करताना संवेदनशीलपणे कार्यवाही करण्याची आवश्यकता असल्याचे पालकमंत्री श्री. भोसले यांनी सांगितले. चारा उपलब्धतेसाठी नियोजन; पशुपालकांनी काळजी करू नये पिण्याच्या पाण्यासोबतच पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध होण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत आवश्यक नियोजन आणि उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्यातील चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी घालण्यात आली असून, डिसेंबर अखेरपर्यंत हा चारा पुरेल. त्यानंतरच्या चारा उपलब्धतेसाठी पशुसंवर्धन विभागाने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे; त्यामुळे पशुपालकांनी कोणतीही काळजी करू नये, असे आवाहन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पासह जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांमधील पाणीपातळी अतिशय कमी असल्याने पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांना नागरिकांनीही सहकार्य करावे, पाण्याची बचत आणि त्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले. ***

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत