महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानामध्ये लातूर जिल्ह्यात ७४ अर्धन्यायिक प्रकरणांचा निपटारा

महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानामध्ये लातूर जिल्ह्यात ७४ अर्धन्यायिक प्रकरणांचा निपटारा लातूर, दि. ०१ : महसूल प्रशासनातील विविध अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या जमिनीशी संबंधित महसुली दाव्यांचा जलद आणि कायमस्वरूपी निपटारा करण्यासाठी लातूर जिल्ह्यात ३० ऑक्टोबर रोजी महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ७४ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. महसूल प्रशासनात मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर अर्धन्यायिक न्यायालयात जमिनींशी संबंधित महसूली दावे मोठ्या प्रमाणावर दाखल होत असतात. एका स्तरावर निकाल लागल्यानंतर पक्षकार वरिष्ठ न्यायालयात पुन्हा अपील किंवा पुनरीक्षण अर्ज दाखल करतात, ज्यामुळे हे दावे वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविल्या जाणाऱ्या लोक अदालतीच्या धर्तीवर दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने व तडजोडीने हे महसूली दावे कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान आयोजित करण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या निर्देशानुसार लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड आणि अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ३० सप्टेंबर २०२६ रोजी लातूर जिल्ह्यामध्ये मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) आणि अपर जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान आयोजित करण्यात आले. या महसूल लोक अदालतीमध्ये एकूण ७४ प्रकरणांचा दोन्ही पक्षकारांच्या संमतीने आणि तडजोडीने निपटारा करण्यात आला. महसूल विभागामार्फत अशा प्रकारच्या लोक अदालतीचे आयोजन यापुढेही नियमितपणे करण्यात येणार असून, नागरिकांनी आपली प्रलंबित प्रकरणे कायदेशीर चौकटीत राहून तडजोडीने निकाली काढण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत