जलसेवा संकल्प अभियानामध्ये पाण्याच्या वापराबाबत जनजागृतीवर भर द्यावा-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड
जलसेवा संकल्प अभियानामध्ये पाण्याच्या वापराबाबत जनजागृतीवर भर द्यावा-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड
• जलसंपदा विभागाच्या जलसेवा संकल्प अभियानाला प्रारंभ
• २ ते १७ ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन
लातूर, दि. ०२ : जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील सद्यस्थितीतील जलसाठा अतिशय कमी आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत जनजागृतीसाठी उपक्रम जलसंपदा विभागाच्या वतीने जलसेवा संकल्प अभियानाअंतर्गत आयोजित करावेत, असे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी सांगितले.
जलसेवा संकल्प अभियानाला जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांच्या हस्ते सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, लातूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या प्रशासक तथा अधीक्षक अभियंता रुपाली ठोंबरे, कार्यकारी अभियंता महेंद्र काळे, मयूर महाजन, मधुमती तोरणाळे व नागेश व्हट्टे, महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रशांत दाणी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिलीप जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांना जलजागृतीची शपथ देण्यात आली.
पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा जपून वापर करणे, हीच खरी जलसेवा आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाण्याची बचत आणि काटकसरीने वापर करण्याला प्राधान्य देण्याची गरज आहे. या अनुषंगाने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत. सद्यस्थितीत सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा कमी असल्याने गाळ उपसा करण्यासह इतर जलसंधारणाची, प्रकल्प दुरुस्तीची कामे हाती घावीत. तसेच सिंचन प्रकल्पांच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवून त्यामध्ये जमा झालेला कचरा बाहेर काढावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी दिल्या.
जलसेवा संकल्प अभियानात पाणी बचतीचा संकल्प करण्यासह त्याबाबतच्या जनजागृतीवर भर देण्यात येईल. तसेच उपलब्ध पाण्याचा नियोजनबद्ध वापर आणि तलावांची दुरुस्ती, स्वच्छता आदी कामे हाती घेण्यात येणार असल्याचे श्रीमती ठोंबरे यांनी यावेळी सांगितले.
जलसेवा संकल्प अभियानानिमित्त पाण्याच्या वापराबाबत जनजागृतीसाठी जलसंपदा विभागाने आयोजित केलेल्या मोटारसायकल रॅलीला जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी हिरवी झेंडी दाखवली. या माध्यमातून पाणी बचत आणि पाण्याच्या काटकसरीने वापराबाबत संदेश देण्यात आला.
***
Comments
Post a Comment