सोयाबीनवरील रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशिक्षणासह बियाणाचे वाण विकसित करण्यासाठी प्रयत्न करा - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.
· श्री सिद्धेश्वर कृषि
महोत्सवाचे थाटात उद्घाटन
· कृषि उत्पादने, नवनवीन
तंत्रज्ञानाची 182 दालने
· ‘आंतरराष्ट्रीय तृणधान्य
वर्ष’निमित्त विशेष दालन
· जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी
महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन
लातूर, दि. 25, (जिमाका): सोयाबीन हे जिल्ह्यातील प्रमुख पीक
असून गेल्या काही वर्षांपासून या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यातील
शेतकऱ्यांना बियाणे, खते वापर आणि लागवडविषयक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण द्यावे.
तसेच लातूर जिल्ह्यासाठी सोयाबीनचे स्वतंत्र वाण विकसित करण्यासाठी कृषि विभागाने प्रयत्न
करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आज येथे दिल्या.
कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने श्री सिद्धेश्वर मंदिर येथील विलासराव देशमुख यात्री निवास हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या श्री सिद्धेश्वर कृषि महोत्सव 2023 चे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते झाले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, आत्माचे संचालक दशरथ तांबाळे, विभागीय कृषि सहसंचालक साहेबराव दिवेकर, श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थानचे प्रशासक सचिन जांबूतकर, विश्वस्त तथा माजी महापौर विक्रम गोजमगुंडे, अशोक भोसले, बाबासाहेब कोरे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजकुमार पडिले, जिल्हा कृषि विकास अधिकारी सुभाष चोले, आत्माचे प्रकल्प उपसंचालक आर. एस. पाटील, उपविभागीय कृषि अधिकारी महेश क्षीरसागर यावेळी उपस्थिती होते.
सोयाबीन पिकावर येणाऱ्या पिवळा मोझॅक, शंखी गोगलगायसारख्या दरवर्षी नवीन येणाऱ्या रोगांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने अशा रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. यासाठी कृषि विभागाने आगामी खरीप हंगामापूर्वी मंडळनिहाय, गावनिहाय प्रशिक्षण कार्यक्रम राबवून शेतकऱ्यांना लागवड, बियाणे, खते याविषयीचे प्रशिक्षण द्यावे, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.
लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात
सोयाबीन उत्पादन होत असून येथील बाजारपेठेतील दरावर देशातील सोयाबीनचा दर ठरतो. गेल्या
कित्येक वर्षांपासून जिल्ह्यात सोयाबीन हे प्रमुख पीक असूनही ‘लातूर ब्रॅंड’चे
एकही सोयाबीन बियाणे सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक
कंपन्यांना बीजोत्पादनासाठी प्रोत्साहन देवून सोयाबीन बियाणाचे नवीन वाण विकसित
करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी
दिल्या.
कृषि विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा ‘लातूर पॅटर्न’ विकसित करा
शेतकऱ्यांनी कार्यालयात येण्याची वाट न पाहता कृषि विभागाने ‘सॅच्युरेशन अप्रोच’ने काम करून प्रत्येक गावात जावून शासनाच्या योजनांसाठी पात्र शेतकऱ्यांची गावनिहाय यादी तयार करावी. ते पात्र ठरत असलेल्या योजनांची त्यांना पूर्वसंमती प्रदान करावी. अशी संमती मिळालेले शेतकरी त्यांच्या आवश्यकतेनुसार त्या आर्थिक वर्षात कधीही त्या योजनेचा लाभ घेवू शकतील, अशी कार्यपद्धती विकसित करून कृषि विभागाने योजनांच्या अंमलबजावणीचा ‘लातूर पॅटर्न’ विकसित करावा, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले. तसेच पुढील कृषि महोत्सवापूर्वी या सूचना कार्यान्वित होतील, यासाठी कृषि विभागाने प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
कृषि महोत्सवाच्या माध्यमातून शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञान जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे. याठिकाणी मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांनी आपल्या पीक पद्धतीत बदल करावा. वैविध्यपूर्ण पिकांची लागवड करून एकाच पिकावरील अवलंबित्व कमी करावे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, पोकरा प्रकल्पातून फळबागेसाठी अनुदान देण्यात येते. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. तसेच आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित जिल्ह्यातील बचतगटांच्या माध्यमातून तृणधान्यावर आधारित पदार्थांचे उत्पादन घेण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येईल. यासोबतच प्रत्येक नागरिकाने आपल्या आहारात तृणधान्याचा समावेश करावा, असे आवाहन त्यांनी केले.
शासनाच्या विविध योजना कृषि महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचतील. तसेच या योजनांमुळे उभा राहिलेल्या शेतकऱ्यांच्या यशोगाथाही शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी कृषि महोत्सव उपयुक्त असल्याचे आत्माचे संचालक श्री. तांबाळे यांनी सांगितले.
विद्यापीठाने विकसित केलेली बियाणे, आधुनिक
तंत्रज्ञान यामुळे शेतीपद्धतीत बदल होत आहे. त्यामुळे शेतीतील उत्पन्नात वाढ
होण्यासोबतच उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मदत झाली आहे. असे तंत्रज्ञान, बियाणे,
खते याबाबतची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी कृषि महोत्सव उपयुक्त असल्याचे
विभागीय कृषि सहसंचालक श्री. दिवेकर यांनी सांगितले.
श्री सिध्देश्वर व रत्नेश्वर देवस्थानने नेहमीच विधायक उपक्रम राबवून शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषि प्रदर्शन आयोजित करण्यासह दुष्काळामध्ये जनावरांसाठी स्वखर्चाने चारा छावणी चालविणे, कोरानाच्या दुसऱ्या लाटेमध्ये जंबो कोविड सेंटर उभारणीसाठी सहकार्य केले. तसेच सामुदायिक विवाह सोहळ्यासाठीही मदत केली. शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कृषि महोत्सवाच्या माध्यमातून हीच परंपरा अखंडितपणे सुरु असल्याचे माजी महापौर श्री. गोजमगुंडे यांनी सांगितले.
गेल्या दहा वर्षांपासून प्रत्येक जिल्हास्तरावर कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान पाहायला मिळते. तसेच या तंत्रज्ञानाचा अवलंब शेतीमध्ये करण्याची प्रेरणाही मिळते. श्री सिद्धेश्वर कृषि महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, शासनाच्या योजना, शेतकऱ्यांच्या याशोगाथांची माहिती देण्यासाठी 182 दालने उभारण्यात आली आहेत. तसेच पाचही दिवस विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन होणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कृषि महोत्सवाला भेट देवून शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी, असे आवाहन प्रास्ताविकामध्ये श्री. गावसाने यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाने तयार केलेल्या तीन घडीपुस्तिकांचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले, आत्माचे प्रकल्प उपसंचालक आर. एस. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
तृणधान्यापासून बनलेला बुके देवून मान्यवरांचे स्वागत
संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2023 हे वर्ष
‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक
तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. यानिमित्त पौष्टिक तृणधान्यविषयक जनजागृतीसाठी कृषि
विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कृषि महोत्सवातही तृणधान्य विषयक माहिती
देण्यासाठी स्वतंत्र दालन, ‘मिलेट हाऊस’ उभारण्यात आले आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा व राजगिरा या सारख्या तृणधान्याचे
आहारातील महत्व व त्याचे फायदे यामाध्यमातून सांगण्यात आले आहेत. तसेच या
महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचे स्वागतही ज्वारी, बाजरीची
कणसे आणि सुर्यफुल यापासून बनवलेला बुके देवून करण्यात आले.
कृषि प्रदर्शनातील
दालनांना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांची भेट
आधुनिक कृषि तंत्रज्ञान, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उत्पादित केलेला शेतमाल, बीजप्रक्रिया केलेले बियाणे, बचतगटांच्या वस्तूंची दालने कृषि प्रदर्शनात उभारण्यात आली आहेत. कृषि महोत्सवाच्या उद्घाटनानंतर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी या प्रदर्शनीला भेट देवून पाहणी केली. तसेच शेतकरी, बचतगटांच्या महिला आणि विविध कृषि तंत्रज्ञान, संशोधन संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
Comments
Post a Comment