विकसित भारत रोजगार व अजिवीका हमी अभियान (ग्रामीण) लातूर येथे जिल्हास्तरीय कार्यक्रमात घरकुल, सिंचन विहीर ई-मस्टर काढून अंमलबजावणीला प्रारंभ

*वृत्त क्र. : 440* विकसित भारत रोजगार व अजिवीका हमी अभियान (ग्रामीण) लातूर येथे जिल्हास्तरीय कार्यक्रमात घरकुल, सिंचन विहीर ई-मस्टर काढून अंमलबजावणीला प्रारंभ लातूर, दि. ०२ : भारत सरकारने नव्याने केलेल्या 'विकसित भारत रोजगार व अजिवीका हमी अभियान (ग्रामीण)' (व्हीबीजी-राम-जी) अधिनियम-२०२५ राज्यात १ जुलै २०२६ पासून लागू झाला आहे. त्यानुसार विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) जिल्ह्यात राबविण्यास प्रारंभ झाला आहे. यानिमित्त लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या उपस्थितीत घरकुल, सिंचन विहीर कामाचे ई-मस्टर काढून अंमलबजावणीला सुरुवात झाली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, बांधकाम व आरोग्य सभापती ज्ञानेश्वर बिराजदार, कृषी व पशुसंवर्धन सभपती कविता गोरे, महिला व बालकल्याण सभपती शिवकन्या गोडभरले, रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ, विभागीय वन अधिकारी अमितराज जाधव, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दिलीप जाधव, गट विकास अधिकारी संतोष माने यावेळी उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) विषयक घडीपुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) या योजनेमुळे ग्रामीण विकासाला चालना मिळणार आहे. जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील. यासाठी ग्रामीण भागात योजनेची जनजागृती करण्यासह या अंतर्गत विविध विकास कामे करण्यावर भर दिला जाईल, असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषाताई पाटील यांनी यावेळी सांगितले. नागरिकांचे ग्रामीण भागातील स्थलांतरण थांबविणे आणि त्यांना ग्रामीण भागातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) अंतर्गत प्रयत्न केले जाणार आहेत. या योजनेतून ग्रामीण भागात जलसुरक्षा व जलसंधारणाची कामे, मूलभूत ग्रामीण पायभूत सुविधा, उपजीविका आधारित पायभूत सुविधा आणि आपत्ती प्रतिबंधक कामांवर या योजनेत भर देण्यात येणार आहे. या माध्यमातून ग्रामीण भागात सुविधा निर्मितीला चालना मिळणार आहे. ग्रामीण भागाच्या विकासाला नवी दिशा देणारी ही योजना अधिकाधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी प्रयत्न करावेत, असे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना म्हणाले. कोणतीही योजना राबविण्यात प्रत्यक्ष फिल्डवर काम करणारे कर्मचारी यांचे योगदान महत्वाचे आहे. यापूर्वी मनरेगा योजनेच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात चांगले काम झाले. जलसंधारण, घरकुल व रस्त्यांची कामे झाली. आता विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विविध विकास कामे राबविण्यासाठी सर्वांनी समन्वयाने प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे यांनी सांगितले. उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आशिष पावले यांनी योजनेबाबत पीपीटीद्वारे माहिती दिली. सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले, तर गट विकास अधिकारी संतोष माने यांनी उपस्थितांचे आभार मानले. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन