लातूर शहरातील नागरिकांच्या सुरक्षतेसाठी शासन कटीबध्द आहे
                                                 - पालकमंत्री संभाजी पाटील - निलंगेकर
      
        लातूर,दि. 11: लातूर शहरातील वाहतुकीची समस्या लक्षात घेता शहरातील विविध प्रमुख रस्त्यांवर सिग्नलची आवश्यकता होती.  त्यामुळे शहरातील नागरिकांच्या विशेषत: विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील 13 चौकांमध्ये ट्रॅफिक सिग्नल्स लावण्यात येणार आहेत. लातूर शहरातील  नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन कौशल्य विकास, कामगार कल्याण, भूकंप पुनर्वसन व माजी सैनिक कल्याणमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.  संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केले.
            लातूर शहरातील हनुमान चौक येथील ट्रॅफिक सिग्नल्सचा शुभारंभ पालकमंत्री श्री.  निलंगेकर यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.  यावेळी खासदार डॉ. सुनील गायकवाड, जिल्हाधिकारी पांडूरंग पोले, पोलीस अधिक्षक शिवाजी राठोड, महापालिका आयुक्त रमेश पवार, उपायुक्त संभाजी वाघमारे, नगरसेवक चंद्रकांत चिकटे आदि मान्यवर उपस्थित होते.
            पालकमंत्री श्री.  निलंगेकर पुढे म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून लातूर शहर महापालिकेला नाविन्यपूर्ण योजनेतून ट्रॅफिक सिग्नल्सकरिता निधीची उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सिग्नल्सच्या एकूण प्रस्तावित 13 कामांपैकी हनुमान चौक येथील सिग्नल्सचे काम पूर्ण झाल्याने नागरिकांच्या सेवेसाठी त्या कामाचे आज उद्घाटन करण्यात आले.  महापालिकेने यापुढे होणा-या कोणत्याही कार्यक्रमांसाठी सर्वसामान्य नागरिकांना सावलीत बसविण्याबाबतची व्यवस्था करावी, अशी सूचना श्री. निलंगेकर यांनी केली.
             प्रारंभी पालकमंत्री श्री.  निलंगेकर यांच्या हस्ते हनुमान चौक येथील ट्रॅफिक सिग्नलसच्या नामफलकाचे अनावरण झाले व त्यानंतर सिग्नल्सचा इलेक्ट्रॉनिक स्वीच ऑन करुन ट्रॅफिक सिग्नल्सचे उद्घाटन करण्यात आले.
               लातूर शहरामध्ये नाविण्यपूर्ण योजने अंतर्गत विविध चौकामध्ये ट्रॉफिक सिग्नल बसविणे कामात जिल्हा नियोजन समिती कडून 1 कोटी 43 लाख 15 हजाराच्या अंदाजपत्रकीय कामास मंजुरी देण्यात आलेली आहे. यामध्ये आंबेडकर चौक , नंदी स्टॉप, नवीन रेणापूर नाका, हनुमान चौक, सुभाष चौक, राजस्थान शाळा, खर्डेकर स्टॉप, गुळ मार्केट, दयानंद चौक, म.जी. प्रा. पाण्याची टाकी, बसवेश्वर चौक, लातूर, आदिंचा समावेश आहे.
               सदरील कामाचा अवधी हे सहा महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे. सदरील कामात सिग्नल व्यवस्था, झेब्रा क्रॉसिंग व साईनेज बोर्ड ह्या सा-या गोष्टीचा समावेश असून ई-टेंडर प्रक्रियेद्वारे हे सर्व काम  इसीई (इंडिया) एनर्जीज प्रा. लि. अमरावती यांना दिनांक 6 जानेवारी मध्ये देण्यात आलेले

असून त्यांअतर्गत सदरील कामाचे हनुमान चौक  ट्रॅफिक चौक हे संपुर्णपणे चालू केले आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

****


Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु