कारखानदारांनी औद्योगीक सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे
- अपर जिल्हाधिकारी
लातूर,दि. 9: प्रत्येकाचे जीवन हे
महत्वाचे असते. त्यामुळे कारखान्यात काम करणारे कामगार व इतर लोकांच्या जीवीताला कोणत्याही
प्रकारची हानी पोहोचणार नाही याची जबाबदारी संबंधित उद्योजकाची असते. त्यामुळे कारखानदारांनी
औद्योगीक सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहीजे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी
पुरुषोत्तम पाटोदकर यांनी केले.
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील डी.पी.डी.सी. सभागृहात
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय व एन. डी.आर. एफ. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने
कारखानदारांसाठी औद्योगीक सुरक्षा आणि ऑनसाइट आपत्तीकालीन आराखडा याबाबत कार्यशाळेचे
आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात अपर जिल्हाधिकारी पाटोदकर बोलत
होते. यावेळी एन.डी.आर.एफ. चे पथक प्रमुख जे. एस. मुरमू, उपप्रमुख एन. एस. परचाके,
मेजर बी. एम. नवले, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप रोकडे, प्रादेशिक
अधिकारी व्ही. जे. मुरुमकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी आदि मान्यवर
उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी श्री. पाटोदकर म्हणाले की, कायदा
हा प्रत्येकांसाठी समान असतो. त्यामुळे प्रत्येक नागरिक, उद्योजक यांनी कायद्यांतील
नियमांचे पालन करणे आवश्यक असते. तसेच कायदयातील
नियमांचे काटेकोरपणे पालन झाल्यास कोणाचेही नुकसान होत नसते, असे त्यांनी सांगितले.
जिल्हयातील सर्व कारखानदारांनी औद्योगीक सुरक्षा
नियमांचे चोखपणे पालन करून कारखान्यातील काम करणाऱ्या कामगार व इतर लोकांच्या सुरक्षेची
काळजी घेणे आवश्यक असल्याचे श्री. पाटोदकर यांनी स्पष्ट केले.
एन.डी.आर.एफ.चे पथक प्रमुख श्री. मुरमू यांनी
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) च्या कार्याची माहिती देऊन आजच्या औद्योगीक
सुरक्षा व ऑनसाईट आपत्तीकालीन आराखडया विषयी
सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येक कारखारदारांनी कार्यशाळेत देण्यात येणाऱ्या
सुचनांचे पालन करण्याचे आवाहन केले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. उस्मानी
यांनी प्रास्ताविकात औद्योगीक सुरक्षा व ऑनसाईट आपत्तकालीन आराखड्याची माहिती दिली.
सदरचा आराखडा प्रत्येक कारखान्यांनी बनवून त्यातील सुरक्षा उपाय योजनांची अंमलबजावणी
आपल्या कारखान्यात करण्याची सूचना त्यांनी दिली.
ह्या कार्यशाळेत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल
5 वी बटालियन पुणे अंतर्गतच्या जवानांनी रासायनिक आपत्ती मध्ये आवश्यक असलेल्या साहित्यांची
माहिती दिली. यात सदरचे साहित्य प्रत्येक कारखान्यात उपलब्ध करण्याचे त्यांनी आवाहन
केले. त्यानंतर जवानांनी साहित्य कशा पध्दतीने हाताळले पाहीजे याबाबत प्रात्यक्षिके
सादर केली. या कार्यशाळेस मोठ्या प्रमाणावर कारखानदार उपस्थित होते.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल दिनांक 3 मार्च ते
10 मार्च 2017 या कालावधीत जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी आपत्ती प्रतिसाद, प्रथमोपचार,
स्थलांतरण, पुनर्जीवीकरण तंत्र याबाबत प्रशिक्षण प्रबोधन करत आहे.
****
Comments
Post a Comment