सर्व महिलांनी न्यूनगंड बाजूला ठेवून कार्यरत राहावे
                             - जिल्हाधिकारी पांडुरंग पोले

           लातूर,दि. 8: समाजकारण, राजकारण, विज्ञान-तंत्रज्ञान , शिक्षण यांसह इतर सर्व क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करुन आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटावित आहेत. तरि अशा महिलांचा इतर सर्व महिलांनी आदर्श समोर ठेवून न्यूनगंड न बाळगता काम करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पांडूरंग पोले यांनी केले.
            आज दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त प्रशासनाचा जिल्हास्तरीय महिला दिनाचा कार्यक्रम डी. पी. डी. सी. सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन जिल्हाधिकारी श्री. पोले बोलत होते. यावेळी जिल्हापुरवठा अधिकारी शोभा जाधव, प्रमुख पाहुण्या राजश्री शाहु महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सायली समुद्रे, उपविभागीय अधिकारी सर्वश्री जनार्धन विधाते, प्रवीण फुलारी, भवानजी आगे, उप जिल्हानिवडणूक अधिकारी प्रताप काळे , लघुपाटबंधारे क्रमांक-2 च्या कार्यकारी अभियंता श्रीमती आर ठोंबरे यांच्यासह सर्व तहसीलदार उपस्थित होते.
             जिल्हाधिकारी श्री. पोले म्हणाले की, आजच्या काळात स्त्रियांनी पुरुषांची मक्तेदारी असलेली सर्व क्षेत्रे पादाक्रांत केलेली आहेत. आजच्या स्त्रीया समस्यांचे संधीत रुपांतर करुन पुढील वाटचाल करत आहेत.  तसेच शैक्षणिक प्रगतीमध्ये मुलांपेक्षा मुलीच श्रेष्ठ ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
            सर्व श्रेत्रातील सकारात्मक दृष्टीकोन ठेवून चांगले काम करणा-या महिलांचा आदर्श इतर महिलांनी घेऊन कार्यरत राहण्याचे आवाहन श्री. पोले यांनी करुन आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. त्याप्रमाणेच ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ यावर आपले मनोगत व्यक्त करणा-या 6 वर्षाच्या किरण जगन्नाथ शेवाळे या मुलीचे विशेष कौतुक श्री. पोले यांनी केले.
          आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रा. समुद्रे ह्यांनी महिला सक्षमीकरणाच्या कार्यात समाजाने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच स्त्री-वादाकडे समाजाने मानवतावादी दृष्टीकोनातून बघितले पाहीजे, असे त्यांनी स्पष्ट केले. जगाचा इतिहास पाहिला असता स्त्रीयांना त्यांचे हक्क संघर्षातूनच प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे स्त्रीयांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून घर, कुटुंब व आपले काम चोखपणे बजाविण्याची सूचना प्रा. समुद्रे यांनी केली.  त्याप्रमाणेच काम न करणा-या म्हणजे गृहिणी असलेल्या स्त्रीयांनी अपराधाची भावना मनात बाळगू नये असे त्यांनी सांगितले.
              कारण गृहिणी ह्या घरांमध्ये सर्वस्व झोकूण देऊन कुटुंबाची जबाबदारी पार पाडतात. त्यामुळे घरातील पुरुष मंडळी बाहेर बिनधास्तपणे काम करत असतात असे श्री. समुद्रे यांनी सांगितले.  तसेच स्त्रीयांनी स्वयं सामर्थ्याची जाणीव ठेवून रोजच्या समस्यांना तोंड दिले पाहीजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
          संघटित क्षेत्रात महिलांच्या प्रश्नांची किमान दखल तरी घेतली जाते परंतु असंघटीत क्षेत्रातील महिलांच्या प्रश्नाबाबत सर्व समाजाने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे मत प्रा. समुद्रे यांनी व्यक्त केले.  त्यामुळे जागतिक महिला दिनीच महिलांच्या कार्याची अठवण करण्यापेक्षा रोजच्या जीवनात सर्वसमावेशकपणे महिलांच्या कार्याची दखल घेतली पाहीजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
              किरण जगन्नाथ शेवाळे या 6 वर्षाच्या चिमुकलीने स्त्री-पुरुष समानता, बेटी बचाओ बेटी पढाओ, स्त्रीभृण हत्या , स्त्री शक्ती महत्व या बाबींवर प्रखरपणे आपले विचार मांडून संपूर्ण सभागृह व सर्व समाजाला उपरोक्त बाबींवर विचारमग्न केले.
                जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती जाधव यांनी आजच्या जागतिक महिला दिनाचा उद्देश सांगून स्त्रीयांनी स्वत:च्या व्यक्तीमत्वाचा विकास करण्याचे आवाहन केले. जिल्हा प्रशासनामध्ये महिला अधिकारी व कर्मचा-यांना सौजन्याची वागणूक मिळत असल्याने येथे काम करत असताना आपल्याला रोजच महिला दिन असल्याची जाणीव होत असल्याचे त्यांनी संगितले.यावेळी पुरस्कार प्राप्त महिलांमधून श्रीमती प्रेमला वतनी व श्रीमती वनिता कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
            प्रारंभी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले व महिला अधिका-यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. पोले यांच्या हस्ते सामाजीक क्षेत्रातील महिला, महसूल विभागातील महिला अधिकारी व कर्मचा-यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्याप्रमाणेच आजच्या दिवसाचे औचित्य साधून निवडणूक विभागाने नवीन महिला मतदारांना मतदार कार्डचे वाटप श्री. पोले यांच्या हस्ते केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहसीलदार (सर्वसाधारण) रुपाली चौगुले यांनी केले तर आभार श्रीमती जहागिरदार यांनी मानले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने सर्व क्षेत्रातील महिलांची उपस्थिती होती.
सामाजिक क्षेत्रात काम करणा-या महिला :-
      1) कु. जागृती शिवपुत्र चंदनकेरे (लातूर) (2) श्रीमती कुलकर्णी वनिता गोविंदराव (मौ. नांदुर्गा ता. औसा). (3) श्रीमती शकुंतला सुभाष इगे  (रेणापूर). (4) श्रीमती मनिषा निळकंठ कलशेट्टी (अनसरवाडा ता. निलंगा). (5) श्रीमती महानंदा ज्ञानोबा मुसळे (मौ. दुवणी खु. ता.देवणी). (6) श्रीमती शुभांगी सुरेशराव नळगीरकर ( रा. नळगीर ता. उदगीर). (7) सौ. भागीरथी सोपान गुट्टे ( रा. उमरदरा ता. जळकोट). (8) श्रीमती प्रेमला वतनी (अहमदपूर). (9) सौ. मायाताई केशव सोरटे ( वडवल ना. ता. चाकूर). (10) सौ. उमादेवी बस्वराज कोरे (शिरुर अनंतपाळ).
****


Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा