नितीमान समाजात ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण होते
                                                  - अपर जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर
           लातूर,दि. 8: ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी फक्त व्यापारी वर्गाचे प्रबोधन करुन चालणार नाही तर संपूर्ण समाजाचे प्रबोधन झाले पाहीजे. कारण नितीमान समाजामध्येच प्रत्येक ग्राहकांच्या हक्कांचे सरंक्षण होत असते, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर यांनी केले.
              मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील डी.पी.डी.सी. सभागृहात जागतिक ग्राहक दिनानिमित्त आयोजित ग्राहक हक्क व जबाबदा-या या विषयावरील चर्चासत्र कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरुन श्री. पाटोदकर मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी शोभा जाधव, भारतीय मार्गदर्शक संस्थेचे सहसचिव दिनेश भंडारे, चेअरमन सिताराम दिक्षीत, श्रीमती मिलन मेस्त्री,   ध्रुपद गायकवाड,  प्राची मयेकर, तहसीलदार संजय वारकड  यांच्यासह जिल्हास्तरीय ग्राहक समितीचे सदस्य उपस्थित होते.
             श्री. पाटोदकर पुढे म्हणाले की, प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक असतो व त्या व्यक्तीमध्ये खरेदी करण्याची तृष्णा ही निसर्गदत्त असते. तसेच ग्राहक व व्यापारी हे समाजाचे घटक असल्याने ग्राहक संरक्षणासाठी संपूर्ण समाजाचे प्रबोधन करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.
             ग्राहकांच्या हक्कांसाठी ग्राहक दिनानिमित्त शासकीय कार्यक्रम घेऊन व्यापारी वर्गाचे प्रबोधन करण्याबरोबरच संपूर्ण समाज प्रबोधनाचे काम करावे. त्यामुळे आदर्श समाजाची निर्मीती होईल व त्यातूनच ग्राहकांचे हक्क अबाधित राहतील, असे श्री.  पाटोदकर यांनी स्पष्ट केले.
              मानवी समाजामध्ये अप्रमाणीक लोकांचे प्रमाण जास्त आहे.  तसेच जे प्रामाणीक लोक आहेत त्यांच्यात अहंकार निर्माण झालेला असल्याने ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे.  त्यामुळे सर्व समाजाचे शुध्दीकरण करुन नितीमान व आदर्शवत समाज निर्माण होण्यासाठी सर्वांनी  स्वत: पासून प्रयत्न करण्याचे आवाहन श्री. पाटोदकर यांनी केले. तसेच कार्यक्रमास उपस्थित ग्राहक व महिलांना जागतिक ग्राहकदिन व जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या.
              भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्थेचे सहसचिव श्री. भंडारे यांनी रोजच्या दैनंदिन जीवनात प्रत्येकांची कशाप्रकारे फसवणुक होत असते याबाबत उदाहरणासह माहिती देऊन त्याबाबत घ्यावयाची काळजी व कार्यवाहीची सविस्तर माहिती सांगितली.  तर अनिंदिता कौर यांनी कन्झ्युमर गाईडन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या स्थापनेची माहिती देऊन या संस्थेमार्फत ग्राहकांसाठी करण्यात येणा-या मार्गदर्शनाची माहिती दिली.  कोणत्याही ग्राहकाला त्याची फसवणूक झाल्याचे समजल्यास त्याबाबतचा सल्ला व मार्गदर्शन संस्थेच्या  1800222262 या हेल्पलाईनवर  विनामुल्य मिळेल, असे श्रीमती कौर यांनी सांगितले.  यावेळी ग्राहक मार्गदर्शक संस्थेचे चेअरमन सिताराम दिक्षीत,  सदस्य श्रीमती मिलन मेस्त्री,  ध्रुपद गायकवाड व आर्थिक सल्लागार प्राची मयेकर यांनी ही ग्राहक हक्कांबाबत यथोचित मार्गदर्शन केले.
              प्रारंभी अपर जिल्हाधिकारी श्री. पाटोदकर व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन जागतिक ग्राहक दिनानिमित्त आयोजीत चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर लातूर ग्राहक पंचायतचे अध्यक्ष जगदिश भराडीया यांनी स्वागतपर ग्राहक गीतांचे गायन केले.

              जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती शोभा जाधव यांनी जागतिक ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमा उद्देश सांगितला. तसेच प्रतिवर्षी दिनांक 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन साजरा होत असतो. परंतु मुंबई वरुन भारतीय ग्राहक मार्गदर्शक संस्थेचे तज्ञमंडळी आज रोजी येणार असल्याने हा कार्यक्रम 8 मार्च रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले. तरि सर्व उपस्थित नागरिकांनी या चर्चा सत्राचा लाभ घ्यावा व कोणत्याही खरेदीमध्ये आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश सरोदे यांनी केले तर आभार तहसिलदार संजय वारकड यांनी मानले.                                                                  ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु