शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यात नियमितपणे सुसंवाद असावा
                                                  - जिल्हाधिकारी

         लातूर,दि. 10: कृषि क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान व हवामानातील बदलांची माहिती सर्वसामान्य शेतक-यांना झाल्यास त्या बदलाच्या अनुषंगाने शेतकरी आपल्या पीक पध्दतीत बदल करुन भरघोस उत्पादन घेऊ शकतात . त्याकरिता शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यात नियमितपणे सुसंवाद असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी केले.
            मांजरा कृषि विज्ञान केंद्र येथे आत्मा व कृषि विज्ञान केंद्रामार्फत आयोजित शेतकरी व शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी श्री. पोले बोलत होते. यावेळी राज्य साक्षरता परिषदेचे माजी अध्यक्ष त्र्यंबकदास झंवर, विभागीय कृषि सहसंचालक शिरीषकुमार जमदाडे,  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  प्रताप सिंह कमद, प्रमुख मार्गदर्शक कृषि हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे, सिताफळ तज्ञ नवनाथ कसपटे, औषधी वनस्पती तज्ञ के. टी. गलांडे, ऑरगॅनिक इंडियाचे विजय भोसले, आत्माचे प्रकल्प संचालक सी. डी. पाटील, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ सचिन डिग्रसे आदि सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                जिल्हाधिकारी श्री. पोले म्हणाले की, भारतात हरितक्रांती होऊन देश अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला. परंतु बदलत्या हवामानाप्रमाणे पीक पध्दतीमध्ये बदल होत नसल्याने शेतक-यांना कमी उत्पादन मिळत आहे. तसेच कृषि क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान व हवामानातील बदलांची माहिती शेतक-यांपर्यंत वेळेत पोहोचत नसल्याने ही शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे. तरि कृषि क्षेत्रातील अद्यावत तंत्रज्ञान व हवामान बदलांची माहिती वेळोवेळी शेतक-यांपर्यंत पोहोचण्यासाठी शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवादाची नितांत आवश्यकता असल्याचे मत श्री. पोले यांनी व्यक्त केले.
               कृषि हवामान तज्ञ डॉ. साबळे म्हणाले की, शेतक-यांनी हवामानातील बदलांचा अंदाज घेऊनच शेती केली पाहीजे. ज्या प्रमाणे शेती केली जात आहे त्यात बदल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याकरिता शेतकरी व समाज हा हवामानातील बदल व मान्सूनचा अंदाज येण्यासाठी जागृत व ज्ञानी बनला पाहीजे, असे ही त्यांनी स्पष्ट केले.
                हवामान बदलांचे अंदाज अचूकपणे येण्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. हवेच्या दाबावर मान्सूनचे गणित अवलंबून असते, असे डॉ. साबळे यांनी सांगितले. भारतात यावर्षी  एल. निनोचा प्रभाव राहणार नाही. त्यामुळे यावर्षी देशात मान्सून चांगला असून काही भागात हा सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचे संकेत डॉ. साबळे यांनी दिले.
                  साधारणत: भारतात 1998 पासून हवामान बदल झाल्याचे जाणवत असून याच कालावधीत कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाणातही मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे तापमानात वाढ होऊन वातावरणात बदल झालेले आहेत. तरि देशातील नागरिकांनी / शेतक-यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचे आवाहन डॉ. साबळे यांनी केले.
           मानवी जीवनाचा पाणी हा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे शेतक-यांनी कमी पाण्याची व हवामानातील बदलाच्या अंदाजानुसार आपल्या पीक पध्दतीत बदल करावेत, असे डॉ. साबळे यांनी सांगितले. राज्यातील सर्व शेतक-यांना एस.एम.एस. च्या माध्यमातून हवामानाच्या बदलांची माहिती मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेतक-यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकाची नोंदणी करण्याचे त्यांनी आवाहन केले.
लातूर’ला साबळे मॉडेल:-
                मागील वर्षी लातूरच्या दुष्काळाची तीव्रता आपण पाहिली असून  या भागातील शेतकऱ्यांनी हवामानातील बदलांची अचुक माहिती देणारे हवामानाचे साबळे मॉडेल लातूर येथे  निर्माण करणार असल्याची माहिती डॉ. साबळे यांनी दिली. त्याप्रमाणेच औरंगाबाद, परभणी व नांदेड येथे ही असे मॉडेल बनविणार असल्याचे त्यांनी सांगितले.  त्यामुळे संपूर्ण मराठवाडयातील शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज देऊन पर्जन्यमान वितरणाची माहिती देणे सोईचे होईल, असे त्यांनी सांगितले.
      यावेळी सिताफळ तज्ञ नवनाथ कसपटे, ऑरगॉनिक इंडियाचे विजय भोसले, औषधी वनस्पती तज्ञ डॉ. के. टी. गलांडे यांनी ही यथोचित माहिती उपस्थित  शेतक-यांना देऊन मार्गदर्शन केले. प्रारंभी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले व मान्यवरांच्या हस्ते कृषि तंत्रज्ञान महोत्सव 2016-17 अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले.
पुस्तिकेचे विमोचन व प्रमाणपत्र वाटप :-
            प्रकल्प संचालक आत्मा कार्यालयाने तयार केलेल्या ‘ सेंद्रीय शेती : शाश्वत शेती आणि प्रमाणिकरण’ या पुस्तिकेचे विमोचन जिल्हाधिकारी पांडूरंग पोले, डॉ. साबळे, श्री.झंवर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच लातूर जिल्ह्यातील 24 सेंद्रीय गटांमधील काही शेतक-यांचा प्रातिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
               विभागीय कृषि सहसंचालक श्री. जमदाडे यांनी कृषि तंत्रज्ञान महोत्सवांतर्गत शेतकरी व शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमाचा उद्देश सांगून कृषि विभाग व आत्मा मार्फत करण्यात येणा-या कामांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली गुंजाळ यांनी केले तर आभार वरिष्ठ शास्त्रज्ञ सचिन डिग्रसे यांनी मानले.
****


Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु