सामाजिक न्याय भवनाची इमारत ही लोकांना न्याय देणारी इमारत झाली पाहीजे
                                      - पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर
 
         लातूर,दि. 12: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाची ही इमारत सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देणारी इमारत झाली पाहीजे. याकरिता सर्व संबंधित विभागांनी व अधिका-यांनी शासकीय योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना न्याय दिला पाहीजे, असे प्रतिपादन कौशल्य विकास , कामगार कल्याण, भूकंप पूनर्वसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
          लातूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ह्या शासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा झाला, त्या प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन  पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार सुधाकर भालेराव, आमदार विनायक पाटील,  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती प्रतिभा पाटील-कव्हेकर, माजी खासदार गोपाळ पाटील, माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हाधिकारी पांडूरंग पोले, समाज कल्याणचे अतिरिक्त आयुक्त सदानंद पाटील, उपायुक्त लक्ष्मण वाघमारे, सहाय्यक आयुक्त बी. जी. अरवत यांच्यासह अन्य मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
           पालकमंत्री श्री. निलंगेकर पुढे म्हणाले की, या न्याय भवनाच्या इमारतीमध्ये सामाजिक न्याय विभागांतर्गतची सर्व शासकीय कार्यालये व मंडळे येणार असून या सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचा-यांनी येथे शासकीय योजनांच्या लाभासाठी येणा-या सर्वसामान्य नागरिकांना चांगली वागणूक व सेवा देणे आवश्यक आहे.  तसेच येथे येणा-या प्रत्येक नागरिकाला आपल्यालान्याय मिळाल्याची भावना झाली पाहीजे त्याकरिता सर्व यंत्रणांना योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.राज्य शासन हे गतीमान पध्दतीने निर्णय घेत असून त्याच्या अंमलबजावणीबाबत प्रशासकीय अधिका-यांनी ही त्याच गतीने काम करुन सर्वसामान्य लोकांना सेवा द्यावी, असे श्री.  निलंगेकर यांनी सांगितले. त्यामुळे या न्याय भवनाच्या इमारतीमध्ये येणा-या कोणत्याही नागरिकाचे शोषण होता कामा नये, असे ही त्यांनी स्पष्ट केले.
            राज्यातील सर्व दलीत बांधवाच्या समस्यांना सामाजिक न्याय विभाग चांगला न्याय देत असून जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत  शासकीय योजनांचा लाभ पोहोचवित असल्याबद्दल सामाजिक न्याय विभागाची प्रशंसा श्री. निलंगेकर यांनी केली.  तसेच या इमारतीच्या परिसरात कौशल्य विकास विभागांमार्फत एक केंद्र उभारण्याचा प्रस्ताव सामाजिक न्याय विभागाकडे पाठविण्यात येईल, असे श्री. निलंगेकर यांनी सांगितले.
             जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती व लाभ मिळण्यासाठी एकाच इमारतीच्या छताखाली सर्व कायालये सुरु झाल्याने लोकांचा त्रास कमी होणार असल्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगून या इमारतीच्या परिसरात कौशल्य विकास विभागामार्फत सुरु करण्यात येणा-या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रासाठीची जागा व निधी सामाजिक न्याय विभागांकडून देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी खासदार सुनील गायकवाड , आमदार सुधाकर भालेराव, आमदार विनायक पाटील यांनीही यथोचित मार्गदर्शन केले.
                प्रारंभी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे व पालकमंत्री श्री. निलंगेकर यांच्या हस्ते सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीचे फीत कापून व दीपप्रज्वलन करुन लोकार्पण करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. सामाजिक न्याय विभागामार्फत मान्यवरांचे स्वागत संविधानाची प्रत देऊन करण्यात आले.
          समाजकल्याणचे अतिरिक्त आयुक्त श्री. पाटील यांनी प्रास्ताविकात सामाजिक न्याय भवनाच्या इमारत व त्याअंतर्गत येणा-या महामंडळाची माहिती दिली. या इमारतीच्या सहा एकर जागेसाठी 3 कोटी 51 लाख रुपये देण्यात आलेले असून यातील 2 हजार 82 चौरस मीटर जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन उभारण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या इमारतीमध्ये एकूण 11 शासकीय कार्यालये लवकरच सुरु होतील असे श्री. पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बापू दासरी यांनी केले तर आभार प्रादेशिक उपायुक्त लक्ष्मण वाघमारे यांनी मानले.
****



Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा